जहाल विचार, मृदू मन

Share
  • प्रासंगिक: ऊर्मिला राजोपाध्ये

२८ मे, स्वा. सावरकर जयंती निमित्त विशेष …

स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येते ती राष्ट्रप्रेमाने भारलेली छबी. आज त्यांच्या हिंदुत्वावर, त्यांच्या कथित माफीनाम्यावर, त्यांच्या काही विज्ञानवादी जहाल विचारांवर टीकात्मक भाष्य केले जाते. त्यांच्याविरुद्ध अपशब्द उच्चारतानाही मागे-पुढे पाहिले जात नाही. मात्र हा जननेता अशा पोरकट प्रयत्नांमुळे समाजमनापासून तुटणे शक्य नाही. त्यांचे विचार कालातीत आहेत. जयंतीच्या निमित्ताने केलेले सावरकरांचे स्मरण. आज जागतिक पातळीवर भारताचा उल्लेख सन्मानाने होताना दिसतो. भारताच्या पंतप्रधानांसह सर्वसामान्य नागरिकांनाही देश-विदेशामध्ये सन्मानाची वागणूक दिली जाते. आज जग भारतीयांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या मतांवर विचार होतो. मात्र ‘साप-गारुड्यांचा देश’ अशी ओळख असणाऱ्या आणि सातत्याने काही वर्षे गुलामीच्या जोखडात पिचलेल्या या देशाला सध्याच्या या स्थानापर्यंत नेण्यासाठी अनेकांचे बळकट खांदे कामी आले आहेत. सामान्यांच्या मनातील गुलामी प्रवृत्ती काढून त्या जागी आत्माभिमानाचे मळे फुलवण्यासाठी अनेकांनी अपार कष्ट सोसले आहेत. देशाभिमान चेतवणारे लेख, कवने लिहून त्यांनी हा अंगार पेटवण्यास मदत केली आहे. अशा अग्रणींमध्ये सावरकर यांचे नाव वरच्या पंक्तीमध्ये असून त्यांची जयंती साजरी करताना प्रतिमेचे पूजन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा परामर्श घेण्याची आणि अवघ्या जीवितकार्यातून त्यांनी दिलेल्या उपदेशाचा विचार करण्याची गरज आहे.

अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकात्मक भाष्य करण्याचे नवे तंत्र बघायला मिळते. राजकारणी स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी, समाजातील एका वर्गाची मते मिळवण्यासाठी ही हीन खेळी खेळताना दिसतात. सावरकरांच्या हिंदुत्वाचा, त्यांनी मांडलेल्या रोखठोक मतांचा चुकीचा अर्थ काढून द्वेषमूलक विधाने करत समाजात दुही निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो. मात्र सावरकर हे नाव या सर्वांच्या खूप पुढे आहे आणि कोणी कितीही प्रयास केले, त्यांनी लिहिलेला मजकूर तुरुंगातील भिंतींवरून पुसून टाकला तरी हे नाव कधीच काळाच्या पटलावरून नाहीसे होणार नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. स्वा. सावरकर या नावाची मोहिनी कालातीत आहे. विनायकरावांची बुद्धी बालपणापासूनच तल्लख होती. बालवयातच त्यांचे वर्क्तृत्व फुलले. त्यातच ते समवयस्कांचे नेते बनले. अंगी असलेल्या देशभक्तीचा विकास नाशिकक्षेत्री हळूहळू होऊ लागला. १८९७ मध्ये चाफेकर बंधूंना रँडसाहेबांच्या खून खटल्यात फाशीची शिक्षा झाली. विनायकरावांनी चाफेकरांच्या या बलिदानावर एक फटका लिहिला. त्यांच्या काव्यगंगेला अशा प्रकारे सुरुवात झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी कुलस्वामिनीसमोर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारताला स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि तिथूनच त्यांच्या भावी जीवनाची दिशा ठरली.

१८९६ मध्ये सावरकरांनी ‘राष्ट्रभक्त’ नावाच्या गुप्त क्रांतिकारी संस्थेची स्थापना केली. त्याचवेळी ते भगूर सोडून नाशिक येथे राहायला आले. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘मित्रमेळा’ नावाची दुसरी संस्था स्थापन केली. शिवजयंती उत्सव सुरू केला. नाशिकचे समाजजीवन भारून टाकले. बालवयातच यमुनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सावरकर उच्च शिक्षणासाठी पुण्यास फर्गुसन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्याच वेळी त्यांचे राष्ट्रकार्य चालू होते. १९०४ मध्ये त्यांनी नाशिक येथे मोठा मित्रमेळा भरवला. त्यासाठी उभ्या महाराष्ट्रातून शेकडो देशभक्त तरुण आले होते. आपल्या या मित्रमेळा संस्थेचे ‘अभिनव भारत’ हे नामाभिधान त्यांनी त्यावेळी केले. १९०४ हे वर्ष म्हणजे वंगभंग चळवळीचा काळ होता. देशभर ही चळवळ वाढली. या चळवळीचा एक भाग म्हणून सावरकरांनी पुण्यात विलायती कपड्यांची होळी केली.

१९०५ मध्ये बी. ए. झाल्यावर बॅरिस्टर होण्यासाठी ते विलायतेला रवाना झाले. या कामी लोकमान्य टिळकांनी त्यांना पाठबळ दिले. तसेच त्यांच्या श्वशुरांनी आर्थिक मदत केली. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह ‘इंडिया हाऊस’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे त्यांनी वास्तव्य केले. ते क्रांतिकारी विचारांच्या तरुण विद्यार्थ्यांचे नेते बनले आणि त्यांना ‘अभिनव भारत’ संस्थेचे सभासद केले. सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनी’ यांचे आत्मवृत्त आणि राजकारण हा क्रांतीची प्रक्रिया सांगणारा ग्रंथ लंडनमध्ये लिहिला. तो खूपच गाजला. त्यांनी त्यावर लिहिलेली प्रस्तावना अधिक गाजली. सरकारने हा ग्रंथ जप्त केला. त्यामुळे त्या ग्रंथाचे मोल अधिक वाढले. या काळात सेनापती बापट आणि पंजाबचे लाला हरदयाळ यांना सहकारी म्हणून लाभले. हरदयाळ यांनी हिंदुस्थानमध्ये येऊन पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना सुरू केली.

१८५७ च्या ‘स्वातंत्र्य समरा’ला १९०७ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. ‘शिपायांची भाऊगर्दी’ या नावाने इंग्रज आणि त्यांच्या भारतीय होयबांनी या युद्धाची अवहेलना केली होती. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्यसमराचा स्मृतिमहोत्सव मोठ्या थाटाने साजरा केला. त्यावेळी ‘ओ मार्टिस’ नावाचे पत्रकही छापून प्रसिद्ध केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘शिखांचा इतिहास’ हा ग्रंथही लिहिला. १९०९ मध्ये सावरकरांच्या ज्येष्ठ बंधूंना म्हणजे गणेश दामोदर ऊर्फ बाबारावांना अटक करण्यात आली. ‘राजाविरुद्ध बंड करणे’ हा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. भारतातील क्रांतीची चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने अत्याचाराचे थैमान मांडले. राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून अनेक तरुणांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. १९०९ मध्ये सावरकरांचे सहकारी मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये जहांगीर हॉलमध्ये कर्झन वायली यास ठार केले. त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू झाला. तेव्हा सावरकरांनी त्यांचे वक्तव्य तयार करून दिले, तथापि धिंग्रांना फाशी झाली. या काळात सावरकरांनी ‘इंडिया हाऊस’ सोडले आणि बिपिनचंद पाल यांच्या घरी राहू लागले. सावरकरांच्या काही मित्रांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले. धिंग्रा प्रकरण शांत झाल्यावर वीर सावरकरांनी प्रचारपत्रके, ग्रंथ, बाँब बनवण्याविषयीची पत्रके, पिस्तुले भारतात पाठवण्याचा धडाका सुरू केला. यावेळी नाशिक येथे विजयानंद नाट्यगृहात नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा खून झाला. या खटल्यात कान्हेरे आणि त्यांचे सहकारी कर्वे आणि देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. जॅक्सन यांना ठार मारण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल सावरकरांनी भारतात पाठवले, असा शोध लागताच सावरकर हेच या कटाचे सूत्रधार आहेत, असे मानून सरकारने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सावरकर पॅरिस येथे वास्तव्य करून होते. तेथे त्यांनी ‘तळवार’ या नावाचे वृत्तपत्र चालवले. या पत्रात त्यांनी कान्हेरे यांचा गौरव केला होता. पुढे इंग्लंडला गेल्यावर त्यांना अटक झाली. हा खटला भारतात चालवण्यासाठी सावरकरांना गुप्तपणे ‘मारिया’ बोटीतून आणले जात असता फ्रान्सच्या किनाऱ्यावरील मार्सेलिस बंदरात बोट थांबली असताना त्यांनी शौचकुपाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली. त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांना भारतात आणले गेले. सावरकरांवर जॅक्सनच्या खुनाचे सूत्रधार म्हणून आरोप ठेवले गेले, तसेच इतर अनेक आरोप ठेवून त्यांना दोन जन्मठेपांच्या म्हणजे ५० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ५० वर्षे काळे पाणी शिक्षा म्हणजे जिवंत राहणे अवघडच होते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी वीर सावरकरांना अंदमान येथील सेल्यूलर जेलमध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांना कष्टाची खूप कामे करावी लागली. उणीपुरी दहा वर्षे सावरकरांनी अंदमानाच्या जेलमध्ये नरकतुल्य यातना भोगून काढली. याच काळात त्यांना ‘कमळे’सारखे नितांत सुंदर काव्य स्फुरले.

भारतातील लोकांनी खूप प्रयत्न केल्यावर सावरकरांची सशर्त सुटका झाली. १९२१ मध्ये त्यांना अंदमानातून हिंदुस्थानमध्ये आणण्यात आले. पाच वर्षे राजकीय चळवळीत भाग घ्यायचा नाही, या अटीवर त्यांना १९२४ मध्ये रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. पुढे साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरी येथे होते. इथे त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले. रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातून अस्पृश्यता आणि रोटीबंदी या बाबींचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. १९३७ मध्ये सर्व निर्बंध रद्द झाल्यावर त्यांनी हिंदू महासभेत प्रवेश केला आणि लवकरच ते त्या पक्षाचे नेतृत्व करू लागले. ‘हिंदुत्व हेच भारताचे राष्ट्रीयत्व’ अशी त्यांची मनोधारणा होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन केलेली ‘अभिनव भारत’ ही संघटना समाप्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ठायी महाकवीची प्रतिभा होती. आत्मचरित्रकार म्हणूनही त्यांनी वाचकांवर खोल ठसा उमटवला. त्यांनी अस्पृश्योद्धाराचा सतत ध्यास घेतला होता, भाषाशुद्धीचे कार्य केले. त्यांनी केलेल्या काव्यांची संख्या ११,००० पंक्ती इतकी भरेल इतकी आहे. त्यांच्या क्षुब्ध अंत:करणाचे उद्गार काव्यातून उमटलेले दिसतात. अशा या भारतमातेच्या थोर सूपुत्राला विनम्र अभिवादन!

Recent Posts

Mumbai rain : मुसळधार पावसामुळे दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…

29 mins ago

Mumbai Rains : पावसाचा आमदार आणि मंत्र्यांनाही फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांना ट्रॅकवरून चालण्याची नामुष्की

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…

1 hour ago

पुण्यात पून्हा हिट अँड रन; भरधाव कारने दोन पोलिसांना उडवले; एकाचा मृत्यू, एक गंभीर

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…

2 hours ago

Rain Alerts : कोकणातही कोसळधार ‘रेड अलर्ट’ जारी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…

2 hours ago

Mumbai Rain: मुंबई तुंबली! सर्व शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी

मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा…

4 hours ago