
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
डॉ. दिलीप अलोणे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील तोहोगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईने त्यांचा सांभाळ केला. त्यांचं शालेय शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील लोकमान्य टिळक विद्यालयात झालं. शालेय जीवनापासून त्यांना नकला करण्याची, वेशभूषा स्पर्धेची आवड निर्माण झाली होती. नकला कलेचे गुरू नाना रेटर यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी शालेय जीवनापासून नकला करण्यास सुरुवात केली. जादूचे प्रयोग करण्याची उत्कंठा त्यांच्या मनात शालेय जीवनापासूनच सुरू झाली. सुप्रसिद्ध जादूगार अशोक प्रभू यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पहिला स्टेज शो केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील जनता महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांनी नाटकात अभिनय केला, नाटके लिहिली, दिग्दर्शित केली. नागपूरला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस. सी. करण्यास प्रवेश घेतला. नागपूरला पद्माकर डावरे एकांकिका स्पर्धा आणि स्व. छाया दुप्पलीवार एकांकिका स्पर्धेत अभिनयासाठी त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं. नाटक होते नाना ढाकुलकर लिखित ‘भिकारी आणि भिकारी’ त्याचवेळी ते मूक अभिनय कार्यक्रम करीत होते. ‘झपाटलेला’ हे तीन अंकी नाटक त्यांनी केले, त्यामध्ये मेघना साने ही नायिका होती, जी पुढे खूप प्रसिद्धीस आली. मुंबईला गेल्यावर अनेक मालिकेत तिने कामे केली.
शिक्षण झाल्यावर ते पाटणला आले. कारण, त्यांची नाळ शेतीशी जुळलेली होती. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग ते करीत होते. कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल व शेतकरी कसा सुखी होईल, हा विचार त्यांच्या मनात डोकावत होता. त्यासाठी ते शेतीमध्ये नवीन प्रयोग करीत होते. याची फलश्रुती म्हणजे त्यांनी दोन नवीन तुरीचे वाण शोधून काढले. एकाच नाव संपदा (अधिक फायदा) व दुसऱ्याचं नाव सोनिया (सोन्याचे नाव) ही ती दोन तुरीची वाण होती. त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. त्यानंतर अनेक चर्चासत्रात, क्रॉप शोमधून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
१९८३ मध्ये वणीला लोकमान्य टिळक महाविद्यालयात डॉ. दिलीप अलोणे यांना मराठी विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी लागली. कॉलेजला प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांच्या हाताशी मोठा विद्यार्थीसमूह आला होता. पुस्तकाच्या बाहेर विद्यार्थ्यांचा कसा सर्वांगीण विकास होईल, याकडे ते लक्ष देऊ लागले. त्यासाठी नवीन प्रयोग त्यांनी केले. लेखक अशोक पवार यांचे ‘बिऱ्हाड’ हे पुस्तक बी.ए.ला मराठी विषयात अभ्यासासाठी होते. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या चांगले लक्षात राहण्यासाठी यावर चाळीस मिनिटांचा लघुपट त्यांनी निर्माण केला. याची दखल विद्यापीठाने घेऊन त्यांना अभिनव उपक्रम पुरस्कार देखील दिला. १९८४ मध्ये शंकर किनगी दिग्दर्शित ‘हालाहाल’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले, डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत लहानशी मुकादमाची भूमिका त्यांनी केली.
१९८६ मध्ये त्यांच्या जीवनात मोठा टर्निंग पॉइंट आला. त्यावेळी साक्षरता अभियान सुरू होते. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी ‘अक्षर किमया’ नावाचा दोन तासांचा मराठी चित्रपट तयार केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका काहीही मानधन न घेता केली होती. पुढे असाच टर्निंग पॉइंट त्यांच्या जीवनामध्ये सुरू राहिला. २००६ मध्ये यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्यावेळी शेतकऱ्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉ. दिलीप अलोणेंनी ‘गर्भात मातीचा दिस सोनियाचा’ या चाळीस मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका केली होती. हा लघुपट खेडोपाड्यातून दाखविला गेला. त्यानंतरचा टर्निंग पॉइंट म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांची काढलेली दिंडी. दाभाडी या गावात शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप झालेल्या होत्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या गावाला भेट दिली होती. अमरावती विद्यापीठाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘वणी ते दाभाडी’ अशी दिंडी काढली. त्यानंतर काही चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केल्या. हरीश इथापे यांच्या ‘विदर्भ क्रांती’ या चित्रपटामध्ये शिक्षकाची भूमिका केली. आनंद कसबे यांच्या ‘भाकरीच्या शोधात’ या चित्रपटामध्ये बहुरूपी इन्स्पेक्टरची भूमिका केली. सुनील जैस्वाल यांच्या ‘आत्मशोध’ चित्रपटात शेतकऱ्याची भूमिका केली.
त्यानंतरचे डॉ. दिलीप अलोणे यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणजे त्यांना प्राप्त झालेले काही पुरस्कार होय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेच्या वतीने त्यांना उत्कृष्ट एकपात्री कलावंत म्हणून देवल पुरस्कार देण्यात आला. हल्लीच त्यांना पुण्याला राष्ट्रीय जादू परिषदेच्या वतीने ‘जादू भूषण’ पुरस्कार प्रसिद्ध जादूगार भाऊसाहेब झोडगे यांच्या हस्ते देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने त्यांची दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक नियामक मंडळावर दोन वेळा कलावंत म्हणून नियुक्ती केली. २००७ मध्ये महाराष्ट्र कृषी विभागाने ‘स्व. वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार’ दिला. २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सांस्कृतिक कार्य लोककला हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. २०१६ मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे डॉ. दिलीप अलोणे यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला. हल्ली १ मे २०२३ रोजी त्यांच्या गावी झरी तालुका पत्रकार संघातर्फे त्यांना ‘तालुका भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अजून एक टर्निंग पॉइंट म्हणजे ते आजदेखील अभिनय प्रशिक्षण वर्ग चालवत आहेत. अनेक नवीन कलाकार त्यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवित आहेत. साहित्य अकादमी पुरस्कृत मराठी कादंबरीतील ग्रामीण जीवनाचे वास्तव या विषयावर त्यांनी पीएच.डी. संपादन केलेली आहे. आज त्यांची तिन्ही मुले डॉक्टर आहेत, दोन सुना देखील डॉक्टर आहेत. हल्लीचा नकलाकार, जादूगार, अष्टपैलू लोककलावंत डॉ. दिलीप अलोणे यांचा टर्निंग पॉइंट म्हणजे त्यांची महाराष्ट्र शासनातर्फे रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे अध्यक्ष आहेत.