
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशाला लवकरच नवीन संसद भवन मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे म्हणजे येत्या रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ७५ रुपयांचे विशेष नाणेही लॉन्च केले जाईल, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हे नाणे भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे महत्त्वही दर्शवेल. या ७५ रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह असेल, ज्याच्या खाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले असेल, तर डावीकडे देवनागरी लिपीत 'भारत' आणि उजवीकडे इंग्रजीत 'इंडिया' लिहिलेले असेल.
नाण्यावर संसदेचे चित्र
या नाण्यावर रुपयाचे चिन्ह देखील असेल आणि अंकांमध्ये ७५ लिहिलेले असेल, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल आणि त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत 'संसद संकुल' तर खालच्या बाजूला इंग्रजीत 'संसद संकुल' असे लिहिलेले असेल. दरम्यान, नव्या नाण्याचा आकार गोलाकार असेल. त्याचा व्यास ४४ मिमी असेल. ३५ ग्रॅमचे हे नाणे चार धातूंनी बनलेले आहे, ज्यात ५०% चांदी, ४०% तांबे, ५% निकेल आणि ५% जस्त आहे.