मुंबई : दादर रेल्वे स्थानकात १५ प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामध्ये ७ प्लॅटफॉर्म्स पश्चिम रेल्वेसाठी आहेत. या ७ पैकी दोन प्लॅटफॉर्म्स धीम्या उपनगरीय गाड्यांसाठी तर तीन प्लॅटफॉर्म्स जलद उपनगरीय गाड्यांसाठी आणि शेवटचे दोन प्लॅटफॉर्म्स हे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनस आहेत. उर्वरित ८ प्लॅटफॉर्म्स मध्य रेल्वेसाठी आहेत.
अनेक नियमित प्रवाशांना या गोष्टीची सवय झालेली असली तरी नव्या प्रवाशांचा मात्र सारख्या क्रमांकांमुळे मध्य व पश्चिम रेल्वेचे फलाट ओळखण्यात गोंधळ होतो. बर्याचदा ठाणे किंवा तत्सम बाजूला जायचं प्रयोजन असलेले प्रवासी गोंधळून पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक १ वर गाडीची वाट पाहत राहतात. तशीच परिस्थिती मध्य रेल्वेच्या बाजूसही पाहायला मिळते.
हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत आता सर्व फलाटांना वेगवेगळे क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या फलाटांना आता सलग १ ते १५ असे क्रमांक देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.