Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाIPL 2025अंतिम फेरीसाठी आज मुंबई - गुजरात झुंज

अंतिम फेरीसाठी आज मुंबई – गुजरात झुंज

विजेता संघ रविवारी चेन्नईसोबत करेल दोन हात

रोहितपुढे आव्हान हार्दिकचे

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : मुंबई आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर २ चा सामना शुक्रवारी रंगणार आहे. यातील विजेता संघ रविवारी चेन्नईसोबत दोन हात करणार आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरातचा चेन्नईकडून पराभव झाला, तर मुंबईने लखनऊचा पराभव करत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. गतविजेता गुजरात आणि पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबई यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

गुजरात आणि मुंबई यांच्यात शुक्रवारी क्वालिफायर २चा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये धडक मारेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांसाठी पूरक अशी आहे.

स्टेडिअमची सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच चौकार-षटकार फटकविण्याच्या नादात विकेट गमवावी लागण्याची शक्यता अधिक असते. या मैदानावर एकेरी, दुहेरी धावांचे तेवढेच महत्त्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो. या मैदानावर १८० धावांपर्यंतच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते हेही तितकेच खरे. अचूक टप्प्यावर टिच्चून मारा करणाऱ्या गोलंदाजाला येथे यश हे मिळतेच.

विजेत्या टीमवर करोडोंचा पाऊस
या हंगामातील बक्षीस रकमेबद्दल बोलायचे झाले तर, विजेत्या संघावर कोट्यावधींचा वर्षाव होणार आहे. तर पराभूत संघही श्रीमंत होईल. गेल्या हंगामातील बक्षीस रकमेशी याची तुलना केल्यास बदल दिसून येईल. आयपीएल २०२२ मध्ये चॅम्पियन गुजरात टायटन्सला २० कोटींची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. तर उपविजेत्या राजस्थानला १३ कोटी मिळाले होते. त्याशिवाय गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सला ६.५ कोटी रुपये देण्यात आले.

या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर यावेळी बक्षीस रकमेत फारसा बदल होणार नाही. विजेत्या आणि उपविजेत्याला अनुक्रमे २० कोटी आणि १३ कोटी दिले जातील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला यावेळीही केवळ ७ कोटी रुपयेच मिळणार आहेत. त्याच वेळी अहवालानुसार, चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला यावेळी केवळ ७ कोटी रुपये दिले जाणार आहे.

मुंबईचा संभाव्य संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, तिलक वर्मा, कॅमरुन ग्रीन, ख्रिस जॉर्डन, हृतिक शौकिन, पीयूष चावला, जेसन बेहरनड्रॉफ, आकाश मधवाल.

गुजरातचा संभाव्य संघ :
वृद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, अल्जारी जोसेफ, मोहित शर्मा, मोहम्मद शमी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -