वीरेंद्र सेहवागने केला कौतुकाचा वर्षाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनऊविरुद्धच्या सामन्यात विक्रमी गोलंदाजी केली. आकाशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही त्याचे कौतुक केले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आकाश मधवालच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला. क्रीडा वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवागने हे वक्तव्य केले.
सेहवाग म्हणाला की, मला देता आले असते, तर मी मधवालला १० पैकी ११ गुण दिले असते. ज्या पद्धतीने त्याने बदोनीला बाद केले, ते अतिशय शानदार होते. मधवालने अवघ्या पाच धावांत पाच बळी घेत अशी आकडेवारी नोंदवली आहे, ज्याची पुनरावृत्ती इतर कोणी करू शकणार नाही, असे मला वाटते. मधवाल हा विचार करणारा गोलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये निश्चितच भविष्य आहे. मधवालने आयपीएल २०२३ मध्ये सात सामन्यांत १३ विकेट घेतल्या आहेत. मधवालच्या वेगवान गतीमुळे बदोनीची विकेट मिळाली. कारण बॅकवर्ड लेन्थ बॉल मारण्याचा विचार करत असताना मधवालच्या गतीने मात दिली.