नाशिक: अंदाज कुछ अलग है, मेरे सोचनेका, सबको मंजिलो का शौक हे, और मुछे रास्ते बनाने का, अशी शेरो शायरी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्याचा विकास करायचा असेल, तर मागास भाग मुंबई आणि बंदरला जोडणं आवश्यक होतं. समृद्धी महामार्ग अनेकांना केवळ स्वप्न आणि घोषणा वाटायचा. पण, मला आणि एकनाथ शिंदेंना विश्वास होता, की महामार्गाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आज ते होताना दिसत आहे.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी जागा हस्तांतरित करण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत कायदा केला. न भुतो असा दर जागेसाठी दिला. पण, अनेक लोकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली. हा महामार्ग होऊ देणार नाही, असं सांगितलं. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात बैठक घेत, हे शक्य नसल्याचं म्हटलं. मात्र, ज्या गावात जाऊन विरोध केला, तेथील लोकांनी स्वत:हून जमीन देण्यास तयार असल्याचं पत्र दिलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.