Wednesday, July 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024विजयाचे आकाश मुंबईच्या कवेत...

विजयाचे आकाश मुंबईच्या कवेत…

मधवालचे विकेट पंचक

इंडियन्सकडून लखनऊचा दारूण पराभव

चेन्नई (वृत्तसंस्था) : आकाश मधवालच्या विलक्षण गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला ८१ धावांनी पराभवाची धूळ चारत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला. आकाशने केवळ ५ धावा देत ५ विकेट मिळवत लखनऊचा सुपडा साफ केला. या विजयामुळे मुंबईने आगेकूच केली असून लखनऊचा हंगामातील प्रवास मात्र थांबला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सवर मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अंकुश ठेवला. आकाश मधवालने मुंबईला विकेटचे खाते उघडून दिले. प्रेरक मंकडला शोकीनकरवी झेलबाद करत मधवालने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. जॉर्डनने कायले मायर्सचा अडथळा दूर करत लखनऊला दुसरा धक्का दिला. कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉयनीस या जोडीने लखनऊचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कृणालची बॅट शांत होती, मात्र स्टॉयनीसने लाजवाब फटकेबाजी करत लखनऊच्या धावांना गती देत होता. त्यात कृणालने स्टॉयनीसची साथ सोडली. त्यानंतर एकाही फलंदाजाने स्टॉयनीसला साथ दिली नाही. स्टॉयनीसने संघातर्फे सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. आकाश मधवाल लखनऊच्या फलंदाजीवर तुटून पडला. त्याने एक दोन नव्हे तर ५ फलंदाजांना तंबूत पाठवले. मधवालने ३.३ षटकांत केवळ ५ धावा दिल्या आणि ५ विकेट मिळवले. विशेष म्हणजे त्याने १७ निर्धाव चेंडू टाकले. मधवालच्या धडाक्यामुळे लखनऊचा डाव १६.३ षटकांत १०१ धावांवर सर्वबाद झाला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मात्र तरीही कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वधेरा यांनी सांघिक फलंदाजी करत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा जमवल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार ठोकला. सूर्याने २० चेंडूंत २ चौकार आणि तितकेच ३३ धावांची भर घातली.

तिलक वर्माने २६, तर नेहल वधेराने २३ धावा जोडल्या. या सांघिक कामगिरीमुळे मुंबईने निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १८२ धावा जमवल्या. लखनऊच्या नवीन उल हक आणि यश ठाकूर यांना धावा रोखण्यात यश आले नसले, तरी त्यांनी मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. नवीन उल हकने लखनऊतर्फे सर्वाधिक ४ फलंदाजांना बाद केले. तर यश ठाकूरने ३ फलंदाजांना माघारी धाडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -