मुलांची निकालात बाजी तर मुलींचा टक्का वाढला
ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२३ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्यात आलेला इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला असून यंदा कोकणचा निकाल ९६.०१ टक्के तर ठाणे जिल्ह्याचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी बारावीचा निकाल ९२.६७ टक्के लागला होता. मात्र यंदा निकालात काही अंशी वाढ झाली असून मुलांनी निकालात बाजी मारली असली तरी मुलींचा टक्का जास्त आहे. मुलांमध्ये १८४४१ पैकी १७००५ मुले पास झाली असून मुलींमध्ये १५५४२ पैकी १४४९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजेच मुलींचा टक्का ९३.४९ तर ९२.४२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दरम्यान, कोकण विभागात पालघर जिल्ह्याचा उच्चांकी निकाल लागला असून पालघर ९३.१२ टक्के तर रायगडचा निकाल ९५.५६ टक्के निकाल लागला आहे.
मार्च – एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के इतका होता. फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल २०२२ च्या तुलनेत या वर्षी निकाल २.९७ टक्के कमी आहे. तथापि फेब्रुवारी-मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ०.५९ टक्के वाढला आहे.
ठाणे जिल्ह्यात ३१ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण
ठाणे जिल्ह्यातील ३३९८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१ हजार ४३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी १४४९४ मुली तर १७००५ मुले उत्तीर्ण झाले आहेत. अशाप्रकारे मुलांचा ९२.४६ टक्के निकाल लागला तर मुलींचा ९३.४९ टक्के लागला आहे.
मुरबाड अव्वल
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण ग्रामीण, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये मुरबाडचा निकाल ९७.१ टक्के लागला असून सर्वात निच्चांकी निकाल उल्हासनगर ८६.५२ टक्के लागला आहे.
कल्याण ग्रामीण ९१.६९, बदलापूर-अंबरनाथ ८६.७४, भिवंडी ८७.३०, भिवंडी शहर ९०.३, मुरबाड ९७.१, शहापूर ९०.५५, ठाणे शहर ९०.७४, नवी मुंबई ९०.६४, मिरा-भाईंदर ९२.२६, कल्याण-डोंबिवली ८७.६५, उल्हासनगर ८६.५२, रायगड विभागात पनवेल ९६.९४, उरण ९३.८८, कर्जत ८६.५५, खालापूर ८३.४२ पेण ९०.४०,अलिबाग ९१.३४, मुरूड ९१.९७, रोहा ९३.१६, सुधागड ८२.३६, तळा ९५.२५, श्रीवर्धन ९४.८९, म्हसळा ९४.८६, महाड ८७.३०, पोलादपूर ८८.१७ टक्के निकाल लागला आहे. पालघर जिल्ह्यात वाडा ८६.५१, मोखाडा ९४.४०, विक्रमगड ८७.४५, जव्हार ७०.४५, तलासरी ८९.५१, डहाणू ८५.२१, पालघर ९०.३८, वसई-विरार ९३.७० असा निकाल जाहीर झाला आहे.