Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीस्वामींचा आधुनिक भक्ती संदेश

स्वामींचा आधुनिक भक्ती संदेश

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

आपण आज कलियुगात जगत आहोत. कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे, याचे कारण कलियुग म्हणजे पाप, व्याभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार याचे माहेरघर आहे. कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एक खंबीर, धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे व त्यासाठी स्वामी समार्थांची भक्तीच आपल्याला तारू शकते, हे त्रिवार सत्य आहे.
स्वामी दत्तभक्तीचे
मुख्य प्रसारक होते!
स्वामी समर्थ हे श्रीदत्तात्रेयांच्या मुख्य चार अवतारांपैकी एक होते, हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे. स्वामी हे नुसतेच दत्तांचे अवतार नव्हते तर, ते एक प्रखर, तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते. स्वामींनी गांजलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या आणि दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता. स्वामी हे अतिशय भक्तवत्सल होते.
भक्तांचे जागृत दैवत म्हणजे
श्रीस्वामी समर्थ होय!
स्वामी हे भक्तसमूहाचे जागृत दैवत होते. त्यांचा भक्तीमार्ग हा साधा, सरळ, सोपा आणि स्वार्थविरहित होता. स्वामी समर्थांनी नुसतेच चमत्कार केले नाही, तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. नोकरी असो, घराचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो वा घरगुती वाद असो, स्वामींनी पुढाकाराने भक्ताचे प्रश्न सोडवून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले.
स्वामी चमत्कारी होते,
पण अंधश्रद्धाळू नाही…
स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते. स्वामींनी भक्तसमूहाला दिशादर्शक करण्यासाठी आणि दत्तात्रेयांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले. पण स्वामींच्या भक्तीमार्गात अंधश्रद्धेला अजिबातच थारा नव्हता. त्यांनी भक्तांना अंगाऱ्या, धुपाऱ्यापासून दूर ठेवले. हे त्यांच्या भक्तीचे विशेष. स्वामींनी कोणत्या भक्ताकडून काही मागणी केली, हे असे अशक्यच होते. त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती. भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे.

स्वामींची भक्ती ही तारक आहे…

श्रीस्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे. संकटसमयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात, असा शेकडो स्वामीभक्तांचा अनुभव आहे. स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे. भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामास्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहे. स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात. त्यामुळेच स्वामी समर्थांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत आहे. स्वामींच्या चमत्कारांचे, त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहेत.
श्रीदत्त हवे असल्यास
स्वामी समर्थांना शरण जा!
कलियुगात सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे आणि जर आपल्याला श्रीदत्त हवे असल्यास स्वामी समर्थांनाच शरण जा!
॥श्रीस्वामी समर्थ
सद्गुरू स्वामी समर्थ॥
॥श्री स्वामी समर्थ॥
॥अवतारही उदंड होती॥
सेवेची मागुती विलया जाती।
तैसी नव्हे दत्तात्रेयमूर्ती।
नाश कल्पांती असेना॥
श्रीदत्तगुरूंचे तिसरे अनियोज अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ होय. श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तगुरूंचे महत्त्वाचे अवतार. या नृसिंहसरस्वतींनी दत्तभक्तीचा खूप प्रसार केला.

नृसिंहसरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि कर्दळी वनात गुप्त झाले. पण श्री स्वामी समर्थ महाराज अजूनही सर्वांच्या हृदयात जागृत आहेत.
स्वामी वदे तुम्ही आता तरुण
संतपुरुष १००० वर्षे अरुण॥१॥
संतकाव्य लाखवर्षे चिरतरुण
पैकापती किती आले गेले मरून॥२॥
घरात ऐसी गाडीत एसी
मॉलात ऐसी मनशांती एैसी की तैसी॥३॥
आयुष्यभर धावपळतच राहाणे
सारे तोंडावर कृत्रिम वागणे॥४॥
कृत्रिम खाणे कृत्रिम पिणे
खिशात खुळखुळे भरपूर नाणे॥५॥
नको माता, नको पिता
नको बहीणबंधू दारू पिता॥६॥
हाती चिलीम वा सिगरेट
मुखी ताडी-माडीचा भपकारा थेट॥७॥
कधी आजूबाजूला २/३ बाईल
कधी खिशात दोन-दोन मोबाइल॥८॥
२४ तास व्हॉटसअ‍ॅप इंटरनेट
फेसबुक इन्स्टाग्रम वायफाय नेट ॥९॥
कधी टिंडर, कधी इन्टेल
कधी डेटिंग कधी मेटिंग फेल॥१०॥
अख्खा दिवस गुगल ईश्वर
नाही हाती ज्ञानेश्वर ॥११॥
तुकाराम, नामदेव खरे ईश्वर
मनाचे श्लोक रामदास ईश्वर ॥१२॥
वाचा भागवत पुराण, शुभंकरोती ईश्वर
गुरू चरित्र, मारुती स्तोत्र, स्वामी बखर॥१३॥
वाचा भगवद्गीता, गीताई, साई चरित्र
गजानन महाराज, शंकर महाराज, स्वामी चरित्र ॥१४॥
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसे नारायण॥१५॥
नाम घ्या स्वामींचे करा पारायण
आयुष आनंदी भेटेल समर्थ/नारायण ॥१६॥

श्रीदत्तात्रयांचे चार अवतार
१) श्रीपाद श्रीवल्लभ
(इ.स. १३२० ते १३५०)
२) श्रीनृसिंह सरस्वती
(इ.स. १३४० ते १३८०)
३) श्रीमाणिक प्रभू
(इ.स. १७३९ ते १७८७)
४) श्रीस्वामी समर्थ
(१९३७ च्या सुमारास)
स्वामी एक जागृत दत्तअवतार
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -