Monday, July 1, 2024

वहिनीसाहेब

  • केतन आजगावकर, प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष, सावंतवाडी

समोर आलेले विषय हाताळण्याचा निलमताई यांचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. साहजिकच याचा फायदा राणे कुटुंबीयांना होतो. रोख-ठोकपणे विचार मांडणाऱ्या निलमताई या बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या वहिनीसाहेब आहेत.

महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री राज्याच्या सर्वोच्च पदावर पुन्हा पुन्हा विराजमान झाले होते आणि त्यामागे त्यांची मोठी राजकीय मेहनत देखील तितकीच महत्त्वाची होती. अगदी यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असो की युतीच्या काळातील मनोहर जोशी, नारायण राणे यांची कारकीर्द ही तितकीच अबाधित आहे. मुख्यमंत्रीपद म्हटलं की अनेक व्हीआयपी लोकांचे सतत वलय पाहायला मिळते आणि त्यामध्ये स्वतःची मूळ व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवणे ही मोठी कला समजावी लागते. सामान्य माणसापासून ते प्रतिष्ठित लोकांमध्ये होतं, बस हा नित्यनेम बनून जातो आणि त्यात महत्त्वाचे फोटो भूमिका बजावतात. त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

अगदी प्रतिभाताई पाटील, उज्ज्वलाताई शिंदे, वैशालीताई देशमुख, निलमताई राणे ते अगदी आजच्या विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पत्नी असो या सर्वांचा साधेपणा लोकांना आजही भावतो. विशेष म्हणजे तो साधेपणा ओढून-जाणून आणलेला नव्हता, तर नैसर्गिक होता. तो आजही तितकाच टिकून आहे. त्यामुळेच आजही त्यांच्याबद्दल सार्वजनिक जीवनात आदरणीय सन्मान टिकून आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेब यांच्या पत्नी निलमताई राणे यांचं. निलमताईंचे व्यक्तिमत्त्व सौम्य, ऋजू आणि पारदर्शी आहे. भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्त्वे आहेत, त्यात निलमताईंचे नाव घेता येईल.

माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब यांच्या प्रचंड कार्यात सतत काळजी वाहणारी, खंबीरपणे साथ देणारी अर्धागिनी सौ. निलमताई पत्नी म्हणून त्यांना लाभली आहे. राणेसाहेब यांच्या कठीण काळात त्यांच्या पत्नी निलमताई या त्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहिलेल्या आपणास पाहायला मिळतात. निलमताई शांतपणे घरची आघाडी सांभाळत असतात. न बोलता त्या राणे साहेबांच्या बरोबरीने एक एक जबाबदारी उचलत असतात आणि बिनबोभाट पार पाडत असतात. घरातील कर्ता पुरुष कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असेल तर त्या घरातील महिलेने स्वतःहून घरातील जबाबदारी सांभाळायला हवी, असे वाटते. राणे कुटुंब राजकारणी आहे. त्यांच्या सलग दोन पिढ्या राजकारणात आहेत. सध्या सर्वच राजकारण हे नारायण राणे यांच्याभोवती केंद्रस्थानी असल्याचे दिसून येतंय.

लग्नानंतरचे प्रेम, त्यानंतरची साथ, नारायण राणेसाहेब आणि पत्नी निलमताई यांच्याकडून शिकाव्यात अशा संसारातील या गोष्टी. नारायण राणेसाहेब हे नाव राजकारणात नेहमीच गाजत आले आहे आणि सध्या तर हे नाव देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी दिसून येतेय. निलमताईं नेहमीच नारायण राणेसाहेब यांच्यासह खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. नारायण राणे आणि निलमताईं यांचे अरेंज मॅरेज आहे. निलमताईं यांनी नेहमीच दादांना पाठिंबा दिला आहे. अॅरेंज मॅरेज झाल्यामुळे दोघांचेही प्रेम हे लग्नानंतर बहरले ते कधीच वेगळे झाले नाही, तर निलमताई यांनी कुटुंब व्यवस्थित बांधून ठेवले. इतक्या वर्षांच्या संसारात निलमताईं कायम नारायण राणेसाहेब यांच्यासह खंबीरपणे राहिल्या. कोणतेही दुःख असो, राजकीय संकट असो वा घरातील जबाबदारी असो निलमताईं यांनी कायम साथच दिली. संसारात हीच गोष्ट महत्त्वाची आहे.

नारायण राणेसाहेब कितीही कामात असले तरीही कुटुंबासाठी कधीच नॉट रिचेबल नसतात. संसारात हेच महत्त्वाचे ठरते. आपल्या कुटुंबासाठी कामातून वेळ काढणे महत्त्वाचे. लोकांची कामं करण्याच्या नादात स्वतःकडे लक्ष देत नाहीत आणि मग वेळेवर जेवण होत नाही. त्यांनी वेळेवर जेवावं हाच हट्ट नेहमी माझा असतो आणि तो ते पुरवत नाहीत, ही एकमेव नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे. यावरूनच दोघांचे एकमेकांवर असणारे प्रेम दिसून येते. राजकारणातून फारच कमी वेळ मिळतो, मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा दादा जंगल सफारीसाठी आपल्या पत्नी आणि कुटुंबासह जातात. कुटुंबाला पूर्ण वेळ देणे शक्य होत नसले तरीही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा कुटुंबासहच राहणे दादा पसंत करतात. केवळ एकत्र राहणे नाही, तर कुटुंबाची जबाबदारी दोघांनी पेलणे आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. निलमताई आणि नारायण राणेसाहेब यांच्या नात्यातून नव्या पिढीने नक्कीच हे शिकण्यासारखे आहे. घर सांभाळून राणेसाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्यात खारीचा वाटा उचलला याचे समाधान वाटते. निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको. राणेसाहेब प्रचार-दौऱ्यावर रोज दहा-बारा प्रचारसभा घेत वणावणा फिरत असतात. अशावेळी निलमताई हे सारं हसत खेळत सांभाळतात. ज्या लोकांकरिता नारायण राणेसाहेबांनी दिवस-रात्र कधी बघितली नाही, सतत त्यांच्या डोक्यात एकच विचार असायचा, तो म्हणजे ‘माझे कोकण. माझे कोकण, कोकणासाठी हे करू, कोकणासाठी ते करू’ अशी गेली अनेक वर्षे डोक्यात एकच विचार ठेवून किती लोकांना त्यांनी मदत केली असेल, याचा काही हिशोब नाही. असे असताना अगदी जवळची वाटणारी माणसे उलटू शकतात, तेव्हा त्याचे निलमताईंना खूप दु:ख होते.

आज लोकांना खरे वाटणार नाही, पण नारायण राणेसाहेब मुख्यमंत्री असताना किंवा उद्योगमंत्री असताना पंच-सप्ततारांकित हॉटेलमधील ‘डिनर’ची अनेक ‘इन्व्हिटेशन्स’ त्यांच्या टेबलावर रोज पडून असायची. पण ते कधीही बाहेर जेवलेले नाहीत. राज्यशिष्टाचारानुसार ते अशा समारंभांना गेले तर सूप पिऊन, सर्वांची माफी मागून जेवायला घरी पोहोचायचे. हा आग्रह निलमताईंचाच. समोर आलेले विषय हाताळण्याचा निलमताई यांचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. साहजिकच याचा फायदा राणे कुटुंबीयांना होतो. मानसिकता बदलल्याशिवाय सामाजिक बदल शक्यच नाही, असे विचार रोख-ठोकपणे मांडणाऱ्या निलमताई या बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या वहिनीसाहेब आहेत. निलमताईंनी घर आणि संसार भक्कमपणे सांभाळल्यानेच राणेसाहेब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातल्या गोळाबेरीज बिनधास्त करू शकले, एवढे मात्र निश्चित.

वहिनींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -