ठाणे (प्रतिनिधी) : दोन हजार रुपयांची गुलाबी नोट सध्या सामान्य ग्राहक ते विक्रेते यांच्यामधील वादाला कारणीभूत ठरत आहे. नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आल्यानंतर देखील नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. तर अनेक पेट्रोल पंपावर देखील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
किरकोळ बाजारात खरेदीसाठी जाणारे सामान्य ग्राहक दोन हजारांची नोट व्यापारी, दुकानदारांना देऊ लागले आहेत. दोन हजारांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सामान्य ग्राहक आणि किरकोळ बाजारातील विक्रेत्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
किराणा माल विक्रेते आणि ग्राहकांचा नियमित संपर्क असतो. किराणा माल विक्रेत्यांकडे दोन हजार रुपयांची नोट देऊन खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. दोन हजारांच्या नोटेवरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी “उधारीवर माल घ्या, पण दोन हजारांची नोट खपवू नका’ अशी भूमिका अनेक व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
दोन हजारांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर किरकोळ बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या अनेकांनी दोन हजारांच्या नोटा कपाटातून बाहेर काढल्या आहेत.
सामान्य नोकरदारांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा फारशा नसतात. पण, अनेकांनी तातडीने पैसे लागल्यास दोन हजारांच्या पाच ते दहा नोटा घरात ठेवल्या होत्या. तरीही काहींनी मोठ्या रकमेची गरज असल्याने साठवून ठेवल्या होत्या. अशा नोटा आता किरकोळ बाजारातील व्यवहारात दिसू लागल्या आहेत. किराणा माल, पेट्रोल पंपचालक तसेच अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.
नियमित दुकानदारांकडून किराणा खरेदी केला. त्याचे ६०० रुपये बिल झाले. दोन हजार रुपयांची नोट दिली. त्यावेळी दुकानदाराने दोन हजार नको, तुम्ही नियमित येता. पैसे नसल्यास नंतर द्या, अशी भूमिका घेतली.
– अंजली वारे (गृहिणी), नौपाडा, ठाणे
नोटा खात्यात भरण्याचा पर्याय
सामान्य माणसांना बँकेतून नोटा बदलून घेण्याचा अथवा खात्यात पैसे भरण्याचा पर्याय आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले असले तरी नागरिक बँकेत जाताना दिसून येत नाहीत. दुकानदार अथवा पेट्रोल पंपावर नोटा देण्यावर नागरिकांचा अधिक भर दिसून येत आहे.