-
ज्ञानेश्वरी: प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
भक्त व ईश्वर यांची एकरूपता हा ज्ञानदेवांच्या अंतःकरणातील विषय! म्हणून त्याचे वर्णन करताना अठराव्या अध्यायात सुंदर दाखले एकामागून एक येतात. जसं मिठाचं पाणी होतं, त्या पाण्यात खारटपणा राहतो, तोही जिरून गेल्यावर जसा मीठपणा नाहीसा होतो, तसा मी (ईश्वर) व तो (भक्त) हा भेद असतो, तोही पूर्ण आनंदाच्या भरात एकत्र होऊन माझ्यात लय पावतो. (ओवी क्र. १२०८, १२०९) त्यानंतर कापूर व अग्नी यांचा दाखला/उदाहरण येतं. कापूर व अग्नी जसे एक होतात, तसे भक्त आणि ईश्वर एक होतात. एकरूपतेची ही अवस्था झाल्यानंतर नेमकं काय होतं? याचं बहारदार वर्णन ज्ञानेश्वर करतात. तो अभिनव दाखला असा – लाभात लाभाची भर पडून, प्रकाशाने प्रकाशास आलिंगन देऊन, आश्चर्य आश्चर्यात उभेचे उभेच बुडून जाते.
ती मूळ ओवी –
तेथ लाभू जोडला लाभा। प्रभा आलिंगिली प्रभा।
विस्मयो बुडाला उभा। विस्मयामाजी॥ ओवी क्र. १२१६
पाहा, किती विलक्षण सुंदर वर्णन! सार्थ वर्णन! ‘लाभाने लाभ जोडला’ म्हणजे काय? माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर काहीजण भक्तिमार्गाकडे वळतात. हे त्यांचं भाग्य, त्यांच्यासाठी लाभ आहे (भक्ती, साधना करता येणं) ती करता करता त्यांना देव लाभणं हा आणखी लाभ. इथे ‘जोडणं’ या क्रियापदातही खूप अर्थ आहे. ‘जोडणं’ ही क्रिया दोन गोष्टींतील नातं दाखवते. भक्ताने भक्ती करून देवाला जणू जोडलं आहे, ते आपोआप घडलेलं नाही, हे यातून सुचवलं जातं.
पुढे वर्णन येतं, प्रभेने (तेजोवलयाने) प्रभेला आलिंगन देणं! प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ज्ञानाची एक ज्योत (प्रभा) असते. भक्ती करू लागल्यावर त्या ज्योतीचा प्रकाश, वलय जाणवू लागतं. असा भक्त पुढे परमेश्वराशी एक होतो म्हणजे जणू एका प्रभेने दुसऱ्या प्रभेला आलिंगन देणं. ‘आलिंगन देणं’ या कल्पनेतही खास अर्थ आहे. कोणतीही दोन जवळची माणसं (आई-मूल, प्रियकर-प्रेयसी इ.) एकमेकांवर प्रेम करतात, तेव्हा ती एकमेकांना आलिंगन देतात. म्हणजे आलिंगन हे प्रेमाचं दिसणारं रूप आहे, त्यात जवळीक आहे. अशा प्रकारे इथे भक्त व ईश्वर यांच्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणून ‘आलिंगन’ येतं, तर त्यांच्यातील ज्ञानाचं, तेजाचं प्रतीक म्हणून ‘प्रभा’ येते. त्यापुढे आश्चर्यात आश्चर्य बुडून जाणं, हा दाखला डोळ्यांसमोर चित्र उभं करणारा! एरवी बुडून जाण्याची क्रिया द्रवरूप/प्रवाही गोष्टींबाबत होते जसं मीठ पाण्यात बुडून जाणं. विशेष म्हणजे ज्ञानदेवांनी इथे ‘आश्चर्य’ या भावनेला साकार केलं आहे, रूप दिलं आहे. एखादी गोष्ट मोठ्या प्रवाहात असते, तेव्हा ती बुडते. इथे आश्चर्य इतकं झालं की, त्यात आश्चर्य़ बुडून गेलं. बुडणारं आश्चर्य, ज्यात बुडतं तेही आश्चर्य! पुन्हा ते कसं? उभेच्या उभे! यातून आपल्यासमोर बुडणारं एखादं झाड, शिखर उभं राहातं.
तसं इथे आश्चर्य आश्चर्यात बुडून गेलं म्हणजे आश्चर्याला विलक्षण आश्चर्य वाटलं! का? कारण हा प्रसंगच विलक्षण आहे की, भक्त व ईश्वर एक झाले! या प्रसंगाचं चित्रण साक्षात करणारे कविश्रेष्ठ ज्ञानोबा! म्हणून म्हणतात,
‘जे न देखे रवी
ते देखे कवी!’