देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत संपूर्ण भारतात पहिल्या चार क्रमांकांवर मुलींनी बाजी मारली आहे. सन २०२२च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला, त्यात इशिता किशोरी ही देशात पहिली आली आहे, तर ठाण्याच्या
डॉ. कश्मिरा संखे हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुणवत्तेनुसार देशात तिचा २५वा क्रमांक लागला असला तरी कश्मिरा संखे हिने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. या आधी दोन वेळा तिने यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातून मेहनत आणि चिकाटी दिसून येते. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीद्वारे सन २०२२ साली घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात ९३३ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यातील ७०हून अधिकजण महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांपैकी जवळपास १२ टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. देशात यंदा मुलींनी बाजी मारली असून, या परीक्षेत टॉप ४मध्ये मुली पुढे आहेत, त्यापैकी इशिता किशोरने अव्वल स्थान मिळवले आहे. दुसरा क्रमांक गरिमा लोहियाने, तर तिसरा क्रमांक उमा हरती एन हिने पटकावला. स्मृती मिश्रा चौथ्या आणि गेहाना नव्या जेम्स पाचव्या स्थानावर आहेत. महाराष्ट्रातून देखील कश्मिरा संखेच्या रूपाने मुलींनी बाजी मारली आहे. जाहीर झालेल्या निकालात पहिल्या १०० जणांमध्ये ७हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत दिवसेंदिवस मराठी टक्का वाढत असून मराठी अधिकाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. काही वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याएवढी संख्या महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची असायची. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे. यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत महाराष्ट्रातील टक्का वाढताना दिसून येत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
या निकालातून काही चेहरे असेही समोर आले आहे की, त्याचे कौतुक कोणत्या शब्दांत करायचे? हा प्रश्न आपल्याला पडेल. ग्रामीण भागात अत्यंत गरिबीत वाढलेल्या मुलाला हुशारी, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर देशाच्या प्रशासकीय सेवेत यश मिळू शकते, याचे एक उदाहरण या निकालातून समोर आले आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. उदरनिर्वाहासाठी वडील चहाची टपरी चालवतात, तर संसाराला हातभार लागावा म्हणून आई विड्या वळण्याचे काम करते. अशा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील पाराजी खिलारी आणि संगीता खिलारी या दाम्पत्याचा मुलगा मंगेश खिलारी हा आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबाला मंगेशने भविष्यातील सुखाच्या स्वप्नांमध्ये नेण्याचे काम केले आहे. देशात तो ३९६ रँक असला तरी त्याचे यश हे सर्वसामान्य कुटुंब घटकातील पालकांनाही प्रेरणा देणारे ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रात प्रथम आलेली कश्मिरा संखे ही सध्या ठाण्यात राहत असली तरी ती मूळची पालघर जिल्ह्यातील एकलारे या छोट्याशा खेड्यातील आहे. ज्या वंजारी समाजातून ती येते, त्या समाजाकडून पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला, तर एक गोष्ट लक्षात येईल की, यातील अनेकजण पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाहीत. मात्र नामोहरण न होता त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. वाचन, लेखनाबरोबर सध्या इंटरनेटच्या जमान्यात यूट्यूबवरील प्रोत्साहन देणारे मोटिव्हेशनल व्हीडिओ तसेच आत्मविश्वासपूर्ण देहबोली या गोष्टी अधोरेखित होतात.
तसे पाहायला गेलो, तर देशात लोकशाही मूल्याची जपणूक करत निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात सरकारे स्थापन होतात. पंतप्रधानापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींना अधिकार देण्यात आले असले तरी प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम हे आयएएस अधिकाऱ्यांना करावे लागते. देशात एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तरीही या आयएएस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारी यंत्रणा ही नेहमीच कार्यरत असते. भारतीय प्रशासकीय सेवा ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आयएएस ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय पोलीस सेवा व भारतीय वन सेवा या इतर दोन सेवा आहेत). आयएएसला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे. आयकर अधिकारी, राजदूत व परराष्ट्र सचिव, केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील सल्लागार, जिल्हा कलेक्टर आदी प्रमुख पदांवर आयएएस अधिकारी कार्यरत असलेले दिसतात.
लोकप्रशासनाचे दोन पैलू आहेत. एक लोक व्यवहार नियंत्रित करणे व मानवी विकासास चालना देण्यासाठी नीती-धोरणे आखणे आणि दुसरे त्याची सुविहित पद्धतीने अंमलबजावणी करून अपेक्षित फलश्रुती देणे. कोणत्याही देशात व सर्वच प्रकारच्या राज्यकारभारात (राजेशाही, हुकूमशाही ते लोकशाही) नीती-धोरणे आखणारे राज्यकर्ते/लोकप्रतिनिधी असतात, तर त्यांची चोख अंमलबजावणी करणारे प्रशासक असतात. मानवी जीवनाच्या इतिहासात जेव्हा माणसांना एकत्र येऊन व्यक्तिगत कामापलीकडे काही करण्याची निकड भासू लागली, तेव्हा माणसांनी संघटना (ऑर्गनायझेशन) बांधायला सुरुवात केली. संघटनेचा जन्म हाच नोकरशाहीचा अर्थात ब्युरोक्रसीचा जन्म होय. या नोकरशाहीत आता मराठी टक्का वाढू लागला आहे. पूर्वी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये उत्तर आणि द. भारतीयांचा भरणा होता, मराठीजनांच्या पुढच्या पिढीने आता आयएएस अधिकाऱ्याचे स्वप्न पाहिल्याने या यादीत मराठी नावे झळकू लागली आहेत. संसार चालविण्याची उपजत कला स्त्रीवर्गाकडे येते, त्या मुली आता आयएएस झाल्याने राज्याचा कारभार नक्कीच संतुलित पद्धतीने चालण्यास मदत होईल, अशी आशा करायला हरकत नाही.