-
जीवन संगीत: सद्गुरू वामनराव पै
आपल्या संतांनी भगवंताचे वर्णन करताना म्हटले आहे “अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याच्यापोटी तो हा हरी नंदाघरी”. याचे वर्णन मी वेगळ्या तऱ्हेने केलेले आहे. हा कृष्ण तुमच्या-आमच्यातही आहे व हे शरीर म्हणजे नंदाचे घर आहे व या ठिकाणी तो वास्तव्याला आलेला आहे. जीवनसंगीतातील कुठलाही स्वर बिघडता कामा नये, यासाठी आपण प्रत्येक स्वराच्या ठिकाणी सावध असले पाहिजे.
सावध असले पाहिजे म्हणजे काय? सावधपणा कसा राखायचा? हे समजण्यासाठी प्रत्येक स्वराचे योग्य व अचूक ज्ञान करून घेतले पाहिजे. आपल्या जीवनात परमेश्वराचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की, तो नाही, तर काहीच नाही व तो आहे, तर सर्व आहे. तो नाही, तर सर्व शून्य अाणि तो आहे तर सर्व आहे. म्हणून आज जगात जे आहे, ते त्यातून आलेले आहे. ते जिथून आले ते परमेश्वराचे स्वरूप अगम्य आहे. आतापर्यंत परमेश्वर म्हणजे काय? हे कुणी सांगू शकलेला नाही. थोडेफार जे सांगता आले, ते संतांनी, ऋषिमुनींनी सांगितले आहे. समुद्र कसा आहे? समुद्र अथांग आहे. आपण समुद्रकिनारी बसलेलो आहोत, तेव्हा त्याला आपण कितीसा बघतो. आपल्याला समुद्र किती दिसतो? क्षितीजापर्यंतच तो आपल्याला दिसतो म्हणजे समुद्राचे स्वरूप तेवढेच आहे का? नाही. समुद्र अथांग आहे व तो आपल्याला संपूर्ण पाहता येत नाही. त्याची खोली पाहता येत नाही. आपण त्याचा वरचा भाग बघतो. पण त्याच्या आत काय काय आहे हे आपल्याला ठाऊकच नाही. समुद्र मी पूर्ण बघितला, असे कुणीही सांगू शकतो. तरी त्यांनी तो पूर्ण बघितलेला नाही.
हत्तीची गोष्ट सांगताना, दहा आंधळे हत्तीचे वर्णन करत होते. एक म्हणाला, “हत्ती केरसुणीसारखा आहे.” कारण, त्याने हत्तीच्या शेपटाला हात लावला होता. बाकीचा भाग त्याने बघितलाच नाही, तो शेपूट धरून बसला होता. दुसरा म्हणाला, “हत्ती खांबासारखा आहे.” कारण, त्याने हत्तीच्या पायाला हात लावला होता. तिसरा म्हणाला, “हत्ती सुपासारखा आहे.” त्याने हत्तीच्या कानाला हात लावला होता. प्रत्येक जण हत्तीचे वर्णन वेगवेगळे करत होता. प्रत्यक्षात हत्ती वेगळाच होता. प्रत्येकाने जे वर्णन केले, तेही खरे होते. कारण, त्यांनी प्रत्येकाने जे अनुभवले त्याचे वर्णन त्यांनी केले. प्रत्येकाने एकेक भाग हातात घेतला, त्याप्रमाणे त्यांनी त्याचे वर्णन केले. तसे ऋषिमुनींनी, संतांनी जो देव पाहिला तो हा असा पाहिलेला आहे. पूर्णपणे नाही म्हणून “ती नेती नेती म्हणती एकू गोविंदू रे.” परमेश्वरी तत्त्व कुणाला पूर्णपणे आकळता येणार नाही. जीवनविद्या सांगते परमेश्वर आतापर्यंत कुणाला कळलेला नाही. यापुढे तो कुणाला कळणार नाही. मग ते कुणी असो संत, पंत, महंत कुणीही असला तरी त्यांना तो जसा आहे, तसा पूर्णपणे कळणे शक्य नाही.