रत्नागिरी : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे चित्र बदलणार असून आम्ही २४ तास काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं.
रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रंही देण्यात आली.
मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतल्या नऊ तालुक्यांमधून दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे २० विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषी पूरक अभ्यासक्रम सुरु करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकल व चार बसेसचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.