राज्याचा निकाल ९१.२५ टक्के
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे.
कोकण विभाग अव्वल तर मुंबईचा निकाल सर्वात कमी
बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला असून मुंबईचा निकाला ८८.१३ टक्के लागला आहे.
यावर्षी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०९ टक्के, कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४२ टक्के लागला आहे.
बारावीच्या १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के
यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. बारावी परीक्षेच्या १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
विभागनिहाय निकाल
- कोकण : ९६.०१ टक्के
- पुणे : ९३.३४ टक्के
- कोल्हापूर : ९३.२८ टक्के
- अमरावती : ९२.७५ टक्के
- औरंगाबाद : ९१.८५ टक्के
- नाशिक : ९१.६६ टक्के
- लातूर : ९०.३७ टक्के
- नागपूर : ९०.३५ टक्के
- मुंबई : ८८.१३ टक्के