Monday, July 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकरारी बाण्याच्या सौ. निलमताई

करारी बाण्याच्या सौ. निलमताई

  • संध्या प्रसाद तेरसे, महिला अध्यक्ष, सिंधुदुर्ग भाजप

अनेक कठीण प्रसंगातही कधीही न डगमगता करारी बाण्याच्या सौ. निलमताई आम्ही बघितल्या आणि त्यांच्यातली ‘आई’ ती तर प्रत्येक कार्यकर्त्याने पाहिली, अनुभवली आहे.

असं म्हटलं जातं की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि आमच्या वहिनी साहेब आदरणीय निलमताई नारायणराव राणे यांच्याबाबत हे वाक्य शब्दशः तंतोतंत लागू होतं.

पण, असं असूनही राजकारणातील अनेक उत्तुंग पदं भूषविणाऱ्या मा. नारायणराव राणे यांच्या पत्नी, खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या मातोश्री एवढीच त्यांची ओळख नाही, तर निलमताईंनी स्वतःची ओळख आपल्या कर्तृत्वाने जिजाई महिला संस्थेच्या अध्यक्षा, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा यांच्या माध्यमातून निर्माण केली आहे. मंत्रीमहोदयांची पत्नी म्हणून नुसतीच नामधारी अध्यक्षा म्हणून न राहाता स्वत: प्रत्यक्ष लक्ष घालून त्या त्या पदांना न्याय देण्याचा १०० टक्के प्रयत्न आमच्या वहिनीसाहेब सतत करत असतात.

आदरणीय निलम वहिनी माझं प्रेरणास्थान आहेत. माझ्या नर्मदा आई संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र पण मी त्यांच्या हस्ते स्वीकारलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी केलेल्या सर्वच उपक्रम – कार्यक्रम यांना आवर्जून आदरणीय वहिनीसाहेबच मार्गदर्शक असाव्यात, असा माझा नेहमी आग्रह असतो आणि वहिनी पण नेहमीच आमंत्रण आवडीने स्वीकारतात. मला म्हणतात देखील मीच का पाहिजे तुला नेहमी? पण खरंच सांगते, एवढा प्रचंड डोलारा सांभाळताना, प्रचंड ध्येयाने पछाडलेल्या व्यक्तींना समजून घेऊन प्रत्येकाला समजून घेणं सोपं नाहीच. पण, एक स्त्री म्हणून त्या ज्याप्रमाणे आपलं कुटुंब सांभाळतात, सर्वच आघाड्यांवर ते नक्कीच प्रेरित करणारं आहे. एक स्त्री कितीही घराबाहेर राहिली तरी तिचं प्रथम लक्ष आपल्या संसारावर हवं, हे त्यांच्या वागण्यातून आम्हाला दिसतं. राजकारणात काम करत असताना त्रास अनेक असतात, काम करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारी होतात, तुला मोठं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टीतूनच शिकून पुढे जाशील, हा मायेचा, आपुलकीचा सल्लाही मला निलमवहिनींच दिला आहे.

आपल्या पतीसोबत आपणही समाजातील लोकांची सेवा केली पाहिजे, ही भावना मनात घेऊन महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी जिजाई महिला संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी सुरू केली. त्यातून अनेक महिलांना आज रोजगार मिळतोय. जिल्ह्यातील महिला उद्योजकांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

सिंधुदुर्गचे सुपुत्र आदरणीय राणे साहेब यांनी १२ जिल्ह्यांतील लोकांसाठी त्यांच्या आरोग्य संपन्न आयुष्यासाठी पाहिलेलं ‘स्वप्न’ SSPM Hospital पूर्णत्वास नेण्यात वहिनींचा सिंहांचा वाटा आहे. अगदी प्रत्यक्ष हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर, रुग्णांची विचारपूस करणे, वॉर्डमधील व्यवस्था जातीने बघणे हे आजही चालूच आहे. तिथे लागणाऱ्या वस्तू स्वतः बाजारात जाऊन खरेदी करणे. आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या वहिनींना आम्ही प्रत्यक्षात पाहिले. अनेक कठीण प्रसंगातही कधीही न डगमगता करारी बाण्याच्या निलमताई आम्ही बघितल्या आणि त्यांच्यातली आई ती तर प्रत्येक कार्यकर्त्याने पाहिली, अनुभवली आहे.

आज सन्माननीय राणे साहेब केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या खात्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, मोठं व्हावं असं नेहमीच वहिनींचा आग्रह असतो. सन्माननीय राणे साहेब केंद्रीय मंत्री झाले तेव्हाचा प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. आम्ही कुडाळमधील कार्यकर्ते साहेबांना दिल्लीला शुभेच्छा द्यायला गेलो तेव्हा भेटण्याची ठरलेली वेळ उलटून गेली आणि रात्री ८.३० – ९ च्या सुमारास आम्ही बंगल्यावर पोहोचलो, साहेब झोपायला गेले आता भेटणार नाही, असं गेटवर आम्हाला सांगितलं, तरीही मी धीर करून वहिनींना फोन केला, साहेब दिवसभराच्या भेटी-गाठींनी दमलेले तरीसुद्धा सिंधुदुर्गवरून आलेल्या आम्हाला वहिनींनी आत सोडायला सांगितलं. साहेब- वहिनी दोघंही आले, जवळपास दीड तास गप्पा केल्या. कार्यकर्त्यांसोबत आणि आमच्या जेवणाची सोय महाराष्ट्र सदनमध्ये करून आता घरी काही जेवला नाहीत म्हणून दुसऱ्या दिवशी आम्हा सर्वांना वहिनींनी पुन्हा या असं आग्रहाने सांगितलं. आम्हा सर्वांना मिळालेलं समाधान काही वेगळचं होतं. वहिनी नेहमी सांगतात, अगं आम्ही दिल्लीत असलो तरी लक्ष सिंधुदुर्गातच असतं आणि ते खरंच आहे. सर्व कार्यकर्त्यांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारी ही माऊली सदैव सुखी – समाधानी राहो हीच प्रार्थना.

मी माझ्या नर्मदा आई संस्थेच्या माध्यमातून भरवलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उद्योजिकेच्या प्रदर्शनाला निलमवहिनी उद्घाटक होत्या, प्रत्येक उद्योजिकेच्या स्टॉलवर जाऊन तिच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेत सगळ्यांची विचारपूस करत त्याठिकाणी दोन-अडीच तास वेळ दिला आणि कार्यक्रमाच कौतुक केलं. शक्य तितक्यांची उत्पादन विकतही घेतली आणि मुख्य म्हणजे काहीही मदत तुमच्या व्यवसाय वाढीसाठी लागली, तर मला सांगा एवढं मोठं पाठबळ उपस्थित उद्योजिकांना दिलं. आजच्या ग्रामीण भागातील स्त्रीला या प्रोत्साहन – पाठबळाचीच खरी गरज आहे.

राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या महिलांसाठी त्या एक कर्तृत्वाने कर्तबगार स्त्री म्हणून नक्कीच प्रेरणा देतात. मला नेहमीच वाटतं मा. राणेसाहेब, निलेशजी, नितेशजी यांच्या पाठीशी जी प्रचंड ताकद उभी असते त्यात त्यांचं प्रत्येकाचं कर्तृत्व निर्विवाद आहेच, पण कर्तृत्वाला जी दैवी साथ लागते, त्याचं श्रेय निलमताईंनी केलेल्या तपश्चर्येतच आहे हे मात्र नक्की.

आज वहिनींचा वाढदिवस. आदरणीय वहिनी आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणांस आरोग्य संपन्न मनपसंत दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्री गणेशाच्या चरणी मनापासून प्रार्थना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -