नागपूर: निष्कासनाच्या कारवाईनंतर आशिष देशमुख बाजार समितीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधातच दंड थोपटले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्यांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. कारण, काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोटपले आहेत.
नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे, नरखेड बाजार समितीतील राष्ट्रवादीचे सभापती यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात उद्या मतदान होणार असून, राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.
“राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात मोठ्या प्रमाणात संचालक मंडळात नाराजी होती. अविश्वास प्रस्ताव आणण्याकरता १८ पैकी ९ जण लागतात. हा अविश्वास प्रस्ताव पारित होण्याकरता १२ जणांची गरज असते. आमच्या लोकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. तेव्हा १२ जण आमच्याकडे आले. आता, यासंदर्भात उद्या २६ मे रोजी मतदान होईल आणि राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल”, असं आशिष देशमुख म्हणाले.