कुणाच्याही अडचणीला मदतीसाठी धावून जाणं हा सौ. निलमताईंचा स्थायीभाव आहे. याबाबत कसलीही चर्चा नसते किंवा गाजावाजा नसतो. यांचे मदतकार्य बिनबोभाट सुरू असते.
महाराष्ट्रासोबतच देशाचंही राजकारण ज्या नावांभोवती फिरतं, त्यातलं एक नाव म्हणजे नारायणराव राणे. अशी मोठी राजकीय कारकीर्द राहिलेल्या दिग्गज नेत्याची अर्धांगिनी असलेल्या सौ. निलमताई नेहमीच राजकीय पडद्यामागे राहिल्यात. म्हणजे अनेक कार्यक्रमांना त्या नारायणराव राणेसाहेबांसोबत गेल्या तरी त्यांनी कायमच ‘बिहाईंड द सीन्स’ राहण्याची भूमिका घेतली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे एक सुभाषित आहे. त्याचे अनेक विनोदी अवतारही प्रसिद्ध आहेत. ‘गृहिणी सचिव’ हे तर आपल्याकडे सर्वमान्य भाषित आहे; परंतु सचिव किंवा कसलीही बिरुदावली न मिरवता सौ. निलमताई शांतपणे घरची आघाडी सांभाळत असतात. नारायणराव राणेसाहेबांची पत्नी असणे हे पाहणाऱ्याला राजमुकुट मिरवल्यासारखे वाटेल. पण हा मुकुट किती काटेरी आहे, ते धारण करणाऱ्यालाच ठाऊक. हे येऱ्या-गबाळ्याचे कामच नव्हे. ती उत्तम गृहिणी तर हवीच; पण त्याचबरोबर तिला राजकारण आणि समाजकारणाचे भान हवे. समाजाच्या सर्व थरांतून न अवघडता वावरण्याची सहजता हवी. प्रसंगावधान तर हवेच हवे; पण हजरजबाबीपणा व निर्णयक्षमताही हवी. आदरातिथ्य हवे, तसाच सोशिकपणाही हवा. मुख्य म्हणजे वेळेचे उत्तम नियोजन हवे. या साऱ्या अवधानांसह सौ. निलमताईंनी जाणूनबुजून जो ‘लो प्रोफाइल’ स्वीकारला आहे, तो भल्याभल्यांची विकेट उडवणारा ‘गुगली’ आहे.
प्रसिद्धीच्या झोतापासून त्यांनी स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. ‘मला यातलं काही कळत नाही,’ हे सौ. निलमताईंनी मुद्दाम पांघरलेले वेड आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा तर सौ. निलमताई यांचा स्वभाव आहे. पण वागण्या-बोलण्यातील खानदानी एलिगन्समुळे त्या गर्दीतही चांगल्या उठून दिसतात. सिक्युरिटीचा बडेजाव नाही आणि पोलीस एस्कॉर्टचा लवाजमा नाही. त्यामुळे बाजारात असो, देवळात असो की नातेवाईक वा स्नेह्यांकडे जाणे असो; सौ. निलमताई कधी आल्या नि कधी गेल्या, हे कळत देखील नाही.
एवढे मोठे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचे कसब स्त्रीच्या ठायी असावे लागते. सौ. निलमताईंना ते अचूक माहीत आहे. राणेंच्या घरातील व्यवहारचातुर्य, घरातील शिस्त, आदरातिथ्य, स्वच्छता आणि टापटीप. सौ. निलमताईंनी सासर आणि माहेर या दोन्ही घरातील चांगल्या गोष्टी तेवढ्या उचलल्या आणि त्यांची सांगड घालून एक वेगळीच घडी बसवली. सौ. निलमताई आणि नारायणराव राणे हे एक पूर्णपणे एकरूप झालेले जोडपे आहे. एकाच्या मनात जे स्टेशन लागते, तेच स्टेशन दुसऱ्याच्या मनात लागलेले असते. एकाने हात पुढे केला, तर त्याला काय हवे आहे, ते दुसऱ्याला न सांगता समजते. ज्याप्रमाणे छान जुळलेल्या सतारीवर पडद्याच्या तारा छेडल्या की, त्याच्या रेझोनन्सने तरफेच्या ताराही कंप पावू लागतात आणि तीच सुरावट आपोआप उमटते. तसे काहीसे सौ. निलमताई आणि नारायणराव झाले आहेत. राणेंच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता त्यांच्या बायकोलाही लागणार नाही’, असे जे कोणी म्हणतात, त्यांना सौ. निलमताईंची ओळख पटलेली नाही, असेच म्हणावे लागेल. पण, एकंदरीतच सर्वसामान्य जनतेचे कल्याण झाले पाहिजे, सगळेजण सुखी झाले पाहिजेत, या विचाराने सौ. निलमताई कायम अस्वस्थ असतात. कुणालाही कसलाही प्रॉब्लेम येता कामा नये आणि जर का आलाच, तर ती सौ. निलमताईंची जबाबदारी बनते. मग त्या सगळ्या तऱ्हेचे सल्ले देतात. न मागता मदतीचा हात देतात. मदत घेणाऱ्याला अवघड वाटू नये, अशा पद्धतीने समस्येची उकल करतात आणि मगच स्वस्थ बसतात.
तो नारायण ठोसर म्हणाला नव्हता का : ‘चिंता करितो विश्वाची’! हे बीज त्या रामदासाने सौ. निलमताईंच्या मनात कधी रुजवलं कुणास ठाऊक. कुणाच्याही अडचणीला मदतीसाठी धावून जाणं हा सौ. निलमताईंचा स्थायीभाव आहे. याबाबत कसलीही चर्चा नसते किंवा गाजावाजा नसतो. यांचे मदतकार्य बिनबोभाट सुरू असते. नुसत्या कर्तव्यभावनेने नव्हे, तर प्रेमाने, आपुलकीने प्रत्येक स्त्रीला स्वयंरोजगार, स्वयंविकास, स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. त्यासाठी तिला तिच्या आवडीप्रमाणे जगण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे, प्रत्येक विभागात महिलांचा एक छोटा गट तयार करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
छोटे-मोठे घरगुती उद्योग करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करतात. सौ. निलमताईंनी सिंधुदुर्गात ‘जिजाऊ’ संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ दिले. फणसपोळीपासून अगदी कापड उद्योगापर्यंत महिला आज या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत. दीड लाख रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत या महिला पगार घेतात. मुंबईतून गावी वास्तव्यास गेलेल्या एका महिलेला ‘जिजाऊ’ संस्थेमुळे काम मिळाले. आज ती महिला महिना १२ हजार रुपये कमावते. आजूबाजूच्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी त्या आपल्या पोटात ठेवतात. त्याचा साहेबांना त्रास होऊ देत नाहीत. महाराष्ट्रात काही जोडपी अशी आहेत की, त्यांना ‘एक दुजे के लिए’ असेच म्हणता येईल. यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई, शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई, विलासराव देशमुख आणि वैशाली, शरद पवार आणि प्रतिभाताई, अगदी त्याचप्रमाणे नारायणराव राणे आणि सौ. निलमताई यांची जोडी आहे. एकदास सार्वजनिक आणि राजकीय जीवनात वावरायचे ठरवल्यानंतर त्याचे फायदे-तोटे स्वीकारावे लागतात. नेहमीच चांगले दिवस येतील, असे मानता येत नाही. चांगले दिवस अनुभवले, आता थोडा वेगळा अनुभव घेऊ या, असे समजूनच उद्याचा दिवस चांगला उगवेल, या भावनेतून सौ. निलमताईंनी सातत्याने राणेसाहेबांना साथ दिली आहे. लग्नाआधी राजकारणाचा आणि त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. राणे कुटुंबात आल्यानंतर जबाबदारी अंगावर पडत गेली, तशा त्या सक्रिय होत गेल्या. घर पूर्णपणे सांभाळायचे सौ. निलमताईंनी, घरचा सगळा व्यवहार बघायचा सौ. निलमताईंनी. कुटुंबाची सगळी जबाबदारी सौ. निलमताईंवर, संपूर्ण कुटुंब एकाच टेबलावर जेवण्याची शिस्त सौ. निलमताईंची. राणेसाहेब कितीही व्यापात असले तरी ९ वाजण्याच्या आत त्यांनी घरात यायलाच हवे, हा आग्रह सौ. निलमताईंचाच. मालवण-कणकवलीचा असो, नाहीतर लंडनचा दौरा असो, नारायण राणे कधी कुठे एकटे गेले नाहीत आणि जात नाहीत. सौ. निलमताई सावलीसारख्या सोबत आहेतच. आदरणीय नारायण राणेसाहेबांना जीवनरूपी प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ. निलमताईजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…