Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमाघारी निंदा करणाऱ्या लोकांचं करायचं काय?

माघारी निंदा करणाऱ्या लोकांचं करायचं काय?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना जर खूप मनस्ताप किंवा मानसिक त्रास कशामुळे होत असेल, तर त्याचं कारण आहे, आपल्याबद्दल इतरांनी चुकीचं, वाईट, निंदनीय बोलणं, आपल्या पाठीमागे आपली बदनामी करणं, आपल्याला अपशब्द वापरणे आणि आपल्याबद्दल चुकीच्या, नकारात्मक गोष्टी पसरवणे. बोलणारे कितीही लपून बोलले, त्यांनी कितीही साळसुदपणाचा आव आणला, तोंडावर आपल्याशी चांगलं वागले तरी त्यांनी केलेल्या कागाळ्या कोणाही मार्फत आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहात नाहीत आणि आपल्याला त्याचा त्रास झाल्याशिवाय होत नाही.

आपल्या परिवारात, ओळखीत, नात्यात, समाजात, शेजारी, कार्यालयात अशी अनेक लोकं असतात जी आपल्याला खूप चांगली वाटत असतात, आपल्याशी चांगले वागत-बोलत असतात. आपण देखील याच भ्रमात असतो की, समोरचा आपल्याशी जसा वागतोय, बोलतोय तसाच तो मनाने पण आपल्याबद्दल कायम चांगलाच विचार करतोय. कधी न कधी कोणत्याही निमित्ताने आपल्याला कोणाकडून तरी समजतं की, ती व्यक्ती इतरांना आपल्याबद्दल चुकीचं सांगते, आपल्याबद्दल खालच्या दर्जाचे बोलते, आपल्याबद्दल कोणत्याही विषयात पूर्ण माहिती नसताना ती व्यक्ती आपल्या पाठीमागे आपल्यावर जाहीर आणि यथेच्छ टीका करते आहे. अशा वेळी अनेकदा असं वाटते की, ताबडतोब जावं आणि त्या व्यक्तीला जाब विचारावा की, तू माझ्याबद्दल असं का बोलला? मला समजलं तू काय बोलला, कसं बोलला, कोणाजवळ बोलला, मला याने सांगितलं, त्यानं सांगितलं. इथून-तिथून समजलं, चल आपण खरं-खोटं करू, शहानिशा करू. समोरील व्यक्ती अशा वेळी गांगरून जाते, बचावाचा पवित्रा घेते, आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते, उलट दुसऱ्याबद्दलच आपल्याला चुकीचं सांगते, आपला त्यावर विश्वास बसावा म्हणून अनेक काल्पनिक खोट्या कथा तयार करून स्वतःची बाजू पद्धतशीर मांडते. या सगळ्यांमुळे आपण अजून गोंधळून जातो, नेमक कोण खरं बोलतोय? ज्यानं आपल्याला सांगितलं तो, की ज्यानं हे सगळं समर्थन दिलं तो? आपल्याबद्दल नेमकं कोण अपप्रचार करतंय, कोण आपली निंदा करतंय या विचाराने आपण हैराण होतो.

असे प्रसंग सातत्याने आपल्या समोर येत असतात. अगदी डोळे झाकून आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतोय अशी जीवाभावाची माणसं सुद्धा आपल्या माघारी आपली निंदा- नालस्ती करत असतात. यातून आपण एकच शिकायचं की, जी माणसं आपल्या माघारी आपल्याबद्दल चर्चा करतात, याचाच अर्थ ही प्रत्येकाला तसंच वागवतात, प्रत्येकाला पाठीमागे नावं ठेवण्यात, त्याच्याबद्दल अपशब्द वापरण्यात ही माणसं पटाईत असतात. आपणच नाही तर यांच्या संपर्कातलं कोणीही असं नसतं, ज्याच्याबद्दल हे कोणाजवळ वाईट अथवा चुकीचं बोलत नाहीत. संपर्कातील प्रत्येकाला यांनी कोणत्या न कोणत्या कारणास्तव बदनाम केलेलं असतं, त्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तोंडावर बोलायचे एक, दाखवायचे एक, वागायचं वेगळंच हा यांच्या स्वभावातील स्थायिभाव असतो.

मानवी स्वभावातील सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, त्याच्या मागे त्याच्याबद्दल अतिशय अर्वाच्य भाषेत इतरांना सांगणं, त्याच्याबद्दल काळे कोळशे उगळतं राहणं. हा दुर्गुण अनेक लोकांना जडलेला असतो आणि अशा लोकांना ही जाणीव पण नसते की, या आपल्या चुकीच्या प्रवृत्तीमुळे आपण एखाद्याला किती दुखावतो, किती मानसिक यातना देतो. अशा माणसांमुळे, त्यांच्या स्वभावामुळे कोणाचं आयुष्य किती प्रमाणात डिस्टर्ब होऊ शकतं, किती माणसं तुटू शकतात आणि किती नातेसंबंध बिघडू शकतात, याची त्यांना कल्पना पण नसते.

अशी लोकं आयुष्यात फक्त आणि फक्त इतर लोकांबद्दल बोलणं, इतरांच्या कागाळ्या करणं, इतरांच्या बाबतीत चर्चा करणं यातच स्वतःचा वेळ आणि ऊर्जा घालवत असतात. प्रत्यक्षात असो, फोनवर असो, कोणत्याही ठिकाणी असो या लोकांना ही सवय अंगावळणी पडलेली असते. सतत इतरांना दोष देणे, इतरांच्या बाबतीत राग, मत्सर, द्वेष पसरवणे, इतरांचं चारित्र्य, वागणूक, स्वभाव, काम, सवयी याबद्दल सतत स्वतःची मतं देऊन त्याला चुकीचं दाखवण्यासाठी प्रयत्न करणे हा यांचा स्वभाव असतो.

खरं तर असे लोक कोणाशीच प्रामाणिक नसतात, कोणाच्याही विश्वासाला असे लोक पात्र नसतात. इतरांबद्दल कोणतेही चांगले विचार, चांगली माहिती, सकारात्मक बाबी यांच्या संग्रही नसतात, तसं असलं तरी ते इतरांच्या चांगल्या बाजू कधीच कोणासमोर अभिमानाने सांगत नाहीत. कोणाची स्तुती करणं, ती व्यक्ती नसताना सुद्धा त्याचं कौतुक करणं, त्याच्याबाबत चांगला विचार करणं, त्याचं सकारात्मक चित्र इतरांसमोर उभ करणं, कोणाही बद्दल चांगलं बोलणं अशा लोकांकडून कधीच घडत नाही.

अशा लोकांजवळ फक्त इतरांबद्दल तुच्छता, जळफळाट, निंदा, दुबळे विचार, कटुता, मत्सर, संताप आणि राग इतकंच असतं आणि त्याचा ते येथेच्छ वापर करत फिरतात.

आपल्याला अशा वृत्तीच्या माणसांचा, त्यांच्या या सवयीचा मानसिक त्रास होणे अगदी नैसर्गिक आहे. तरीही आपण अशा पातळी सोडून वागणाऱ्या लोकांना सुधारत बसण्यात, समजावत बसण्यात त्यांना ते कसे चुकीचं वागतात, हे लक्षात आणून देण्यात आपला वेळ खर्ची घालण्यात थोडाही अर्थ नसतो. आपल्याला जर अशा स्वतःचं डोकं आणि बुद्धी गहाण ठेवून इतरांबद्दल बडबडणाऱ्या लोकांमुळे होणारा त्रास टाळायचा असेल, तर अशा लोकांपासून कटाक्षाने लांब राहा. अशा लोकांशी कामीत कमी फक्त कामापुरते बोला, अशा लोकांकडून मिळालेल्या कोणाहीबद्दलच्या कोणत्याही माहितीवर पूर्ण विश्वास ठेवू नका, त्यावर आधारित कोणताही निर्णय घेऊ नका, कोणतीही कृती करू नका. अशा मनोवृत्तीच्या लोकांशी कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा अथवा विचारविनिमय करू नका. हे लोक कितीही जवळच्या नात्यातले किंवा संबंधातील असतील तरी त्यांना आपल्या जवळील कोणतीही माहिती, घटना, आपले त्यावरील विचार अजिबात सांगू नका. असे लोक आपल्याला जे सांगतात ते फक्त ऐकून घ्या. त्यावर काहीही कोणतीही प्रतिक्रिया अजिबात देऊ नका. या लोकांबरोबर बोलणं टाळा आणि यांच्याबद्दल इतरांशी पण बोलणं टाळा, इतरांबद्दल यांच्याशी बोलणे टाळा.

अशा लोकांचं बोलणं ऐकून कोणाबद्दल पण आपलं मत बनवण्याची घाई करू नका, यांच्याकडून समजलेल्या कोणत्याही घटनेबद्दल, घडामोडीबद्दल स्वतः शहानिशा केल्याशिवाय कुठेही वाच्यता करू नका. अशी लोकं ज्यांना स्वतःचं कोणतंही वैचारिक नैतिक अधिष्ठान नसतं, ते कधी पलटतील, कधी रंग बदलतील, कधी बाजू बदलतील याची शाश्वती नसते. जे आपली बदनामी करू शकतात, आपला विश्वासघात करू शकतात त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे हा आपलाच मूर्खपणा ठरतो.

आपल्या आजूबाजूला अनेक अशी दुतोंडी लोकं अस्तित्वात आहेत. इतरांमध्ये गैरसमज पसरवून देणे, भांडणं लावून देणे, लावालाव्या करणे, नंतर मजा बघणे यात त्यांना आनंद मिळत असतो. अशा लोकांशी आपण जवळीक ठेवणं म्हणजे आपले इतर नातेसंबंध खराब करून घेणे होय. आपल्या विचार आणि मन परिवर्तनसाठी हे लोकं ठासून खोटं बोलतात, स्वतःचं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी ते पटवून देण्यासाठी कोणतीही पातळी ते गाठू शकतात. स्वतःच्या गळ्याशी आल्यावर वाचण्यासाठी हे कोणाचा पण बळी देऊ शकतात. त्यामुळे आपल्याला अशा लोकांपासून सावध आणि सतर्क राहणं अत्यंत आवश्यक असते. कोणतीही मनातली गोष्ट, कोणताही अति महत्त्वाचा अथवा संवेदनशील विषय अशा लोकांसोबत बोलणे टाळावे. आपल्याकडूनच माहिती काढून घेऊन त्या माहितीचा आपल्याच विरोधात वापर करणे, हेच अशा दुटप्पी लोकांचे ध्येय असते. सतत इतरांबद्दल बोलणारे, अति बडबड करणारे, अति पुढे पुढे करणारे, स्वतःला सगळ्या बाबतीत तज्ज्ञ समजणारे लोकं स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी, स्वतःला सगळं कळतं हे दाखवण्यासाठी सतत इतरांना तुच्छ ठरवण्यात मग्न असतात. त्यामुळे आपण आपली स्वतःची मानसिकता बिघडू न देण्यासाठी अत्यंत संयम आणि शांततापूर्वक अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवावे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -