महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती
ठाणे : गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सतत वाढताना दिसत आहे. यातच राज्यातील सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी ठाणे जिल्ह्यातून आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
महिला आयोगाकडून ठाणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. ज्यात एकूण १७४ महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या असून ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याचे चाकणकरांनी म्हटले आहे.
राज्य महिला आयोगाच्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही सुनावणी झाली. दरम्यान, यावेळी समुपदेशक, पोलीस, विधी अधिकारी यांचा सहभाग असलेले ५ पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण १७४ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीनंतर माध्यमांना माहिती देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगाच्या वतीने ठाणे शहर आणि ग्रामीण भागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या जनसुनावणीत सर्वाधिक ११६ कौटुंबिक समस्या असल्याच्या तक्रारी होत्या. सामजिक समस्या १८, मालमत्ता संबधीत ९, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार ५ आणि इतर २६ अशा एकूण १७४ तक्रारी आल्या होत्या.
राज्यात फिरताना आढाव घेणारा हा माझा २४वा जिल्हा असून, या २४ जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातून आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जनसुनावणीवेळी आलेल्या तक्रारीचे जागच्या जागी नीपटारा करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. या जनसुनावणीवेळी ५ पॅनल तयार करून एकाच वेळी एकुण १७४ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. तसेच यावेळी वेगवेगळ्या विभागाचा देखील आढावा घेण्यात आल्याचे देखील चाकणकर म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी बोलताना, फक्त ठाणे जिल्हाच नव्हे तर राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी आपण टोल फ्री क्रमांकाची सोय केली आहे. ज्यात ११२, ११० आणि १९१ टोल क्रमांकांचा समावेश आहे. मात्र याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली नाही. त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनासह नागरिक म्हणून आपली सर्वांची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.