महाविकास आघाडीची मुंबईत १ मे रोजी झालेली वज्रमूठ सभा ही शेवटची सभा होईल, असे भाकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सभेच्या आधीच वर्तवले होते. तसे घडताना आता दिसत आहे. ऊन- पावसाचे कारण सांगून वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये बेबनाव सुरू झाला आहे. त्यात आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वादाचा शिमगा सुरू झाल्याने, वज्रमूठही आणखीन सैल झाल्याचे दिसून येत आहे. त्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढले आहे. त्यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागल्याचे काँग्रेसचे नेते खासगीत बोलू लागले आहेत. कर्नाटकातील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून तीन पक्षांचे नेते एकत्र आले असले तरी या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचे समान सूत्र हवे असा मुद्दा उपस्थित केल्याचे समजते. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. समान सूत्र हा निकष धरला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सेनेच्या वाट्याला प्रत्येकी १६ जागा येणार आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २०१९ साली जिंकलेल्या १९ जागांवर आम्ही लढणार आणि विजयी होणार, असा दावा उबाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस वाढू लागली आहे. राऊत यांनी महाराष्ट्रातल्या १८ तसेच दिव-दमण येथील एक अशा लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला. या सर्व जागा शिवसेना म्हणून जिंकल्या होत्या. त्यामुळे तेथे असलेले खासदार आता कोणाकडे आहेत, हा प्रश्नच येत नाही आणि या सर्व जागा आम्ही लढणार, याचा ते वारंवार पुनरूच्चार ते करत आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, महाविकास आघाडीमधले जागावाटप अजूनही ठरलेले नाही. अशावेळी महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होईल अशी वक्तव्ये कोणी करू नयेत, असे ठणकावून राऊत यांना सांगितले आहे. कोणी किती जागा लढवायच्या यावर अजून चर्चा झाली नाही. अशावेळी अशा पद्धतीचा दावा करणे चूक आहे, असे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संजय राऊत यांचा दावा खोडून काढला आहे. आधीच जागावाटप कसे जाहीर करता?, लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमधल्या तीनही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. महाविकास आघाडीतील जागावाटप नाट्यावर आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या मते, सिल्व्हर ओक, या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने ठाकरे गटाला फक्त पाच जागांची ऑफर दिली होती. ही ऑफर जर मान्य नसेल, तर तुम्ही आघाडीसोबत निवडणूक लढवू नका असे त्यांना स्पष्टपणे बजावले गेले, अशी माहिती माध्यमांपुढे उघड केली होती. परंतु, ही माहिती खरी आहे की खोटी, हे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ उबाठा सेनेची आता महाविकास आघाडीत किती केविलवाणी स्थिती आहे, हे दिसून येते.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसही आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न मुंबईत करत आहे. काँग्रेसने मुंबईत एक सर्वेक्षणही केले आहे. सर्वेक्षणामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुका लागल्या, तर दोन नंबरला काँग्रेस असेल, असे त्यांना वाटते. काँग्रेसचा पारंपरिक मुंबईतला मतदार दलित, मुस्लीम आणि सर्वसामान्य राहिलेला आहे. त्यामुळे जर एकत्रित निवडणुका लढल्या, तर काँग्रेसचा हा मतदार उबाठा सेनेकडे सरकण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्र लढण्याऐवजी स्वबळावर लढण्याचा पवित्रा काँग्रेसने स्वीकारल्याचे कळते. त्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने महाविकास आघाडीमध्ये नव्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ असून सध्या महाविकास आघाडीमध्ये नंबर एकचे स्थान राष्ट्रवादीचे आहे. त्यानंतर नंबर दोनवर, आम्ही म्हणजे काँग्रेस आहोत. उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याच दृष्टीने सर्व निवडणुकांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल, असे चव्हाण यांनी संकेत दिल्याने उबाठा सेनेला अपेक्षित असलेल्या महाराष्ट्रातील १८ जागा पदरात पडतील का? यावरून आताच शंका उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून उबाठा सेनेला त्यांची जागा दाखवण्याची हीच संधी आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा शिवसेनेचे ५६ आमदार, राष्ट्रवादीचे ५२ आमदार, तर काँग्रेसचे ४४ आमदार हे संख्याबळ होते. जास्त संख्याबळ असल्याने मुख्यमंत्री हे त्यावेळच्या शिवसेनेकडे गेले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेनेला आपल्या पक्षातील ४० आमदार स्वत:कडे ठेवण्यात यश आले नाही, तर मग जागावाटपात २०१९ चा निकष कसा लावता, हा उपस्थित झालेला प्रश्न कळीचा मुद्दा आहे.