रस्ते अपघातातील मृतांची धक्कादायक आकडेवारी!
मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आणि धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सन २०२२ या केवळ एका वर्षामध्ये महाराष्ट्रात तब्बल १५ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
महामार्ग पोलिसांनी राज्यातील अपघात आणि त्यात झालेल्या मृतांची आकडेवारी याबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालातील माहितीनुसार गेल्या वर्षीच्या (२०२१) मृतांच्या टक्केवारीत यंदा घट झाली असली तरी प्रमाण अद्यापही अधिकच आहे.
पाठीमागील १० वर्षांमध्ये रस्ता अपघातांमध्ये लोकांचे जेवढे मृत्यू झाले नाहीत त्याही पेक्षा जास्त मृत्यू केवळ पाठीमागच्या एका वर्षात झाले आहेत. पाठीमागच्या वर्षभरात सुमारे १५,००० हून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले.
यात पाठीमागच्या चार महिन्यांची आकडेवारी पाहिली तर या चार महिन्यांतच तब्बल ४,९२२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांचा अहवाल सांगतो की, राज्यातील वाहन अपघात आणि त्यात होणाऱ्या मृतांची संख्या पाहता सन २०२१ च्या तुलनेत सन २०२२ मध्ये त्यात सरासरी १३ टक्के वाढ झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण पाहिले तर या अपघातांमध्ये झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. २१ टक्के पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
सन २०२० मध्ये रस्ते अपघातांत पाठीमागच्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण, त्या वर्षात कोरोना महामारी उद्भवल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पुढे लॉकनाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर पुढच्याच म्हणजे २०२१ मध्ये अपघातांची संख्या अधिक वाढली.