Saturday, July 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMhada : म्हाडाचे घर कसे घ्यायचे?

Mhada : म्हाडाचे घर कसे घ्यायचे?

म्हाडाची परवडणारी घरे खरेच सर्वसामान्य गरिबांसाठी आहेत का?

रिक्षा-टॅक्सीचालक, नाका कामगार, टपरीवाल्यांसह सर्वसामान्य मुंबईकरही संभ्रमात!

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्यावतीने मुंबईतील ४,०८३ घरांसाठी लॉटरी जाहीर केली असून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी सोडत १८ जुलै २०२३ रोजी काढली जाणार आहे. मात्र, या लॉटरीमध्ये दर्शवलेल्या घरांच्या किंमती या सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरील आहेत. यामुळे रिक्षा-टॅक्सीचालक, नाका कामगार, टपरीवाल्यांसह सर्वसामान्य मुंबईकरही म्हाडाचे घर कसे घ्यायचे या संभ्रमात पडले आहेत.

खासगी विकासकांच्या फ्लॅटच्या तुलनेतही म्हाडाच्या या सदनिकांची किंमत अधिक आहे. त्यामुळे म्हाडाचे घर हे परवडणारे असल्याचे बोलले जात असले तरी या लॉटरीमधील घरांच्या किंमतींवर नजर टाकल्यास हे ‘न परवडणारे घर’ असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे या घरांच्या किंमती पाहता खरेच ही घरे सर्वसामान्य गरीब जनतेसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

अत्यल्प उत्पन्न गट
म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्थात ईडब्ल्यूएस वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंतची मर्यादा असून या गटातील घरांची किंमत २४.७१ लाख रुपये ते ४० लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वसामान्य गरिबांना ४० लाखांपर्यंतची घरे घेणे परवडणारे नाही.
अल्प उत्पन्न गट
अल्प उत्पन्न गटातील अर्थात एलआयजीमधील ९ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या गटात ३१ लाख ते १ कोटी ६१ लाखांपर्यंत घरांची किंमत आहे. त्यामुळे एलआयजीमधील गटातील दीड कोटींपर्यंतची घरे परवडणारी नाहीत.
मध्यम गट
वार्षिक १२ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यम गटातील घरांच्या किंमती ४६ लाखांपासून ४ कोटी ७२ लाखांपर्यंत असल्याने ही घरे कोण खरेदी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे वरील उत्पन्न गटांमधील घरांच्या किंमती पाहता कोणत्याही व्यक्तीला ही घरे घेणे परवडणारे नसून म्हाडाने आपल्या ‘परवडणारी घरे’ या मुळ संकल्पनेला हरताळ फासल्याने या घरांच्या वाढत्या किंमतीचा फटका लॉटरीवर दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.

आजवर म्हाडाच्या घरांच्या किंमती या विभागातील रेडीरेकनरच्या दरापेक्षा कमी करून सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. परंतु यंदा रेडीरेकनरच्या दरानुसार या घरांच्या किंमती ठरवल्याने प्रत्यक्षात खासगी विकासकांनी विक्रीला आणलेल्या सदनिकांच्या किंमतीच्या बरोबरीत म्हाडाच्या या घरांच्या किंमती असल्याने म्हाडा आता परवडणारी घरे देणारे प्राधिकरण नसून ते आता विकासकाच्या भूमिकेत नफा मिळवणारी संस्था असल्याचे या लॉटरीवरून स्पष्ट होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घरांच्या लॉटरीला स्थगिती देऊन या निश्चित केलेल्या दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वसामान्यांचे गृहस्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल अशाप्रकारच्या भावना सर्वसामान्य गरीब जनतेकडून व्यक्त होताना दिसत आहे.

बँकेतून कर्ज घेताना होणार मोठी दमछाक

म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी तब्बल २,७९० सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांची किंमत ३० ते ४० लाख रुपये इतकी आहे. परंतु या सदनिकांसाठी लॉटरीमध्ये यशस्वी ठरल्यास लाभार्थ्याची बँकेतून कर्ज घेताना मोठी दमछाक होणार आहे. किमान मासिक २५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला १३ लाख रुपयांपर्यंतच कर्ज प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जर ३० लाखांपर्यंतच्या सदनिकेसाठी यशस्वी ठरणाऱ्या लाभार्थ्याला मुद्रांक शुल्कासह सुमारे २० लाखांपर्यंतची सोय करावी लागणार आहे. त्यामुळे पगारांवरच अवलंबून असणाऱ्या आणि गाठीशी चार पैसे नसणाऱ्या परंतु म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकाला या घराच्या वाढत्या किंमतीमुळे आपल्या गृह स्वप्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

वार्षिक सहा लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या म्हणजेच महिन्याला सरासरी ५० हजारापर्यंत पगार असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यल्प उत्पन्न गटात घरे राखीव ठेवण्यात आली आहे. या सोडतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ४,०५३ सदनिकांपैंकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी २,७९० घरे राखीव आहेत.

यातील वडाळा सीजीएस कॉलनीतील घरांची किंमत ४० लाख रुपये असून गोरेगाव पहाडी येथील घरांची किंमत ३० लाख ४४ हजार एवढी आहे. तर विक्रोळी कन्नमवारमधील घरांची किंमत ३४ ते ३६ लाख रुपये एवढी आहे. तर चांदिवलीमध्ये एक आणि मानखुर्दमध्ये एका घराचा समावेश आहे. या घरांची किंमत अनुक्रमे २५ आणि २६ लाख रुपये एवढी आहे.

त्यामुळे २० ते २५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला १० ते १३ लाख रुपयांचे बँकेतून कर्ज मिळू शकते. त्यामुळे पहाडी गोरेगाव येथील घरासाठी पात्र ठरल्यानंतरही लाभार्थ्याला २० ते २५ लाख रुपयांची जमवाजमव करावी लागणार आहे. त्यामुळे ही रक्कम सर्वसामान्य गरीब माणूस कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तर ५० हजार पगार असणाऱ्या व्यक्तीला ओढून ताणून २९ लाख रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतरही त्याला मुद्रांक शुल्क व इतर बाबींसाठी ५ ते १२ लाख रुपयांची जमवाजमव करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हे घर खरेदीच करू शकत नसल्याने या उत्पन्न गटामध्ये बसणाऱ्या व्यक्तीला कर्जाव्यतिरिक्त इतरची रक्कम नातेवाईक व आप्त मंडळींकडून प्राप्त झाली तरच ते हे घर खरेदी करु शकतात.

अशा आहेत घरांच्या सरासरी किंमती

अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) : उत्पन्न मर्यादा ६ लाखांपर्यंत
घरांची किंमत : २४.७१ ते ४० लाख

अल्प उत्पन्न गट (एलआयजी) : उत्पन्न मर्यादा वार्षिक ९ लाखांपर्यंत
घरांची किंमत : ३१ लाख ते १ कोटी ६१ लाख

मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) : उत्पन्न मर्यादा वार्षिक १२ लाखांपर्यंत
घरांची किंमत : कमीत ४७ लाख ते जास्तीत जास्त ४ कोटी ७२ लाख

उच्च उत्पन्न गट (एचआयजी) : कमाल मर्यादा नाही
घरांची किंमत : कमीत कमी ८३ लाख ते ७ कोटी ५७ लाख

किती पगारावर बँकेतून मिळू शकते कर्ज

२० हजार पगार : कर्ज १० ते ११ लाख
२५ हजार पगार : कर्ज १३ लाख रुपये
५० हजार पगार : कर्ज २९ लाख रुपये

म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी सदनिका आणि त्याची किंमत

योजना क्रमांक (४१२) पहाडी, गोरेगाव पश्चिम : (१९४७ सदनिका)
सदनिकेची किंमत : ३० लाख ४४ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : १०,५९०

योजना क्रमांक (४१३) वडाळा अँटॉपहिल सीजीएस कॉलनी : (४१७ सदनिका)
सदनिकेची किंमत : ४० लाख रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५,५९०

योजना क्रमांक (४१४) विक्रोळी कन्नमवार नगर: (१६६ सदनिका)
सदनिकेची किंमत : ३४ लाख ७४ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५,५९०

योजना क्रमांक (४१५) विक्रोळी कन्नमवार नगर: (२५८ सदनिका)
सदनिकेची किंमत : ३६ लाख १६ हजार रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५,५९०

योजना क्रमांक (९१ सी) चांदिवली मुंबई: (०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : २४ लाख ७१ हजार ७३३ रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५,५९० रुपये

योजना क्रमांक (३६४ ए) मानखुर्द मुंबई: (०१ सदनिका)
सदनिकेची किंमत : २६ लाख २६ हजार २५४ रुपये
अर्जासोबत भरायची अनामत रक्कम : २५,५९०

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -