Monday, October 20, 2025
Happy Diwali

८-९ महिन्यांनंतर निवृत्तीबाबत निर्णय घेऊ

८-९ महिन्यांनंतर निवृत्तीबाबत निर्णय घेऊ

महेंद्रसिंह धोनीचे स्पष्टीकरण

चेन्नई (वृत्तसंस्था) : चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आलेले असताना खुद्द धोनीनेच याबाबत माहिती दिली आहे. ८ ते ९ महिन्यांनंतर निवृत्तीबाबत निर्णय घेऊ असे धोनी म्हणाला.

चेन्नई सुपर किंग्ज दहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. चेपॉक येथे मंगळवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर धोनीने आयपीएलच्या निवृत्तीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धोनीने सांगितले की, ८ ते ९ महिन्यांनंतर याबाबत निर्णय घेऊ.

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी विचारले की चेन्नईचे प्रेक्षक तुम्हाला इथे पुन्हा भेटतील का? तर धोनी म्हणाला की, मी इथे पुन्हा खेळणार की नाही हे विचारण्याचा प्रयत्न करत आहात? त्यानंतर भोगले यांनी धोनीला प्रश्न विचारला की, तो पुढच्या हंगामात खेळण्यासाठी चेपॉकला परतणार का? धोनीने हसत उत्तर दिले की मला माहित नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ८-९ महिने आहेत. सध्या याबाबत विचार करून त्याला डोकेदुखी वाढवायची नाही.

पुढे धोनी म्हणाला की, मी खेळाडू म्हणून राहीन की कुठल्यातरी रूपात संघासोबत असेन हे या क्षणी मला माहित नाही. पण मला एवढे माहित आहे की मी सीएसके सोबतच राहणार आहे. मी जानेवारीपासून घरापासून दूर आहे. मी मार्चमध्ये सराव सुरू केला. आता डिसेंबरमध्ये आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. म्हणूनच मी आता याचा विचार करत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >