जय शहा यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण समतोलासाठी जगभर ओरड सुरू असताना बीसीसीआयने अनोख्या रीतीने पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’मधील प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी बीसीसीआय ५०० झाडे लावणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती मिरवणारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय पर्यावरणपूरकतेसाठीही जागरूक आहे. निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले वृक्षारोपण बीसीसीआयतर्फे केले जाणार आहे. तेही क्रिकेटला जोडूनच. म्हणजे यंदाच्या हंगामातील आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’मध्ये टाकलेल्या प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी बीसीसीआय ५०० झाडे लावणार आहे. आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी खेळला गेला. या सामन्याच्या प्रक्षेपणावेळी प्रेक्षकांना प्रत्येक डॉट बॉलवर झाडाचे चिन्ह दिसत होते. बीसीसीआयने पर्यावरण टिकून राहण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
निसर्गाचे रक्षण करणे आणि पर्यावरणीय जागरूकता पसरवण्याचे काम आयपीएलमध्ये केले जात आहे हे काही नवीन नाही. आरसीबीने २०११ मध्ये हरित पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक संकल्पना सुरू केली ज्याला “ग्रीन गेम” असे म्हणतात. या अंतर्गत ते दरवर्षी आयपीएलमध्ये एका गेममध्ये हिरवी जर्सी घालून मैदानात उतरतात. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात ८४ चेंडू निर्धाव टाकले गेले. या गणितानुसार ४२ हजार झाडे लावली जाणार आहेत.