Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाIPL 2024फायनल प्रवेशाचा महासंग्राम

फायनल प्रवेशाचा महासंग्राम

धोनीच्या रणनितीसमोर पंड्याची कसोटी

पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई-गुजरात आज भिडणार

चेन्नई (वृत्तसंस्था) : आयपीएलचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून मंगळवारी पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात ही लढत होणार असून हा सामना म्हणजे महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पंड्या या दोन यशस्वी कर्णधारांच्या नेतृत्वाची परीक्षा असल्याचे मानले जात आहे. दोन्ही बाजूला तगड्या फलंदाजांचा भरणा असून एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे फलंदाजीतील कामगिरीच दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) हा सामना खेळला जाणार आहे. घरच्या मैदानाचा सुपर किंग्जला लाभ उठवण्याची संधी आहे. तर गुजरातचा संघ हंगामात पहिल्यांदाच चेपॉकवर सामना खेळणार आहे. हार्दिक पंड्यासमोर अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवी नेतृत्वाची कसोटी आहे. पंड्याने धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात सामने खेळले आहेत. त्यामुळे धोनीचे डावपेच बऱ्यापैकी पंड्याला माहित आहेत. पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने चेन्नईविरुद्ध तीन सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने गुजरातने खिशात घातले आहेत.

चेपॉकची स्लो पीच गुजरातसाठी आव्हान ठरू शकते. चेन्नईचा दीपक चहर पॉवर प्लेमध्ये गुजरातसाठी अडचणी निर्माण करू शकतो. दासुन शनाका गुजरातसाठी ऑलराउंडर व्यतिरिक्त काही अन्य फायदा देऊ शकतो. तो श्रीलंकेचा कर्णधार आहे. चेन्नईकडून खेळणाऱ्या मथीशा परिथाना आणि महिष तिक्षणा यांच्यापासून वाचण्यासाठी शनाकाचा फायदा गुजरातला होऊ शकतो.

दोन्ही बाजूला तगड्या फलंदाजांची मोट आहे. गुजरातचा शुभमन गिल प्रतिस्पर्ध्यांना तारे दाखवत आहे. त्याशिवाय मिलर, हार्दिक पंड्या, राशिद खान, शिखर भरत असे क्षमतावान फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. चेन्नईचा संघही यात मागे नाही. त्यांची फलंदाजी खोलवर आहे. देवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी अशी लांबलचक फलंदाजी त्यांच्याकडे आहे.

दोन्ही संघांमध्ये काही बदल होऊ शकतो. गुजरातच्या संघात वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलचे पुनरागमन होऊ शकते. त्याच्याव्यतिरिक्त फिरकीपटू साई किशोर, यश दयाल यांनाही संधी मिळू शकते. चेन्नईचा संघ कॉन्वे आणि ऋतुराजकडूनच डावाची सुरुवात करेल असे म्हटले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -