
मॉस्को (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अमेरिकेतील तब्बल ५०० नेत्यांवर रशियाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांनुसार या नेत्यांना रशियामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने रशियाच्या काही मोठ्या नेत्यांवर निर्बंध घातले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने हे निर्बंध घातले आहेत, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रशियाने निर्बंध घातलेल्या नेत्यांच्या या यादीत ओबामा व्यतिरिक्त अमेरिकेचे माजी राजदूत जॉन हंट्समन, अनेक अमेरिकन सिनेटर्स आणि संरक्षण दलांचे संभाव्य प्रमुख असलेल्या चार्ल्स क्यू ब्राऊन जूनियर यांचाही समावेश आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध लेट-नाइट टीव्ही शो होस्ट जिमी किमेल, कोलबर्ट आणि सेठ मेयर्स यांनाही रशियाने देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
या यादीमध्ये सरकारमध्ये सध्या असलेले आणि अमेरिकेच्या राजकारणात सध्या अत्यंत प्रभावी असलेल्या नेत्यांचा समावेश आहे. कॅपिटल हिलवर ६ जानेवारी २०२१ रोजी हल्ला करणाऱ्यांशी संबंधित असलेल्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शेकडो समर्थकांपैकी काही नेत्यांवरही निर्बंध घालण्यात आले असल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.