पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनीआ या देशाच्या दौऱ्यावर आहेत आणि तेथे त्या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांना चरणस्पर्श केला. माध्यमात याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत आणि त्यावर म्हटले आहे की, मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा आंतरराष्ट्रीय जगात किती प्रभाव वाढला आहे, याचे हे द्योतक आहे. शंभर टक्के खरे आहे हे म्हणणे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याची गळ मोदींना घालण्यात आली होती. त्यावरून मोदी यांचा भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय जगातही किती प्रभाव आहे, हे सिद्ध झालेच होते. आता तर पापुआ न्यू गिनीआ या देशाच्या पंतप्रधानांनी मोदी यांना चरणस्पर्श केला, ही कृती कितीतरी सांगून जाणारी आहे. कधी कधी राजकारणात लहानशी कृती अनेक चर्चा आणि वाटाघाटी जे सांगत नाहीत, ते सांगून जाते. त्याप्रमाणे मारापे हे मोदी यांच्यासमोर वाकले आणि त्यांना मोदी यांनी मिठीत घेतले, हा ऑप्टिक्सचा भाग असला तरीही त्यातून दोन्ही देशांनी सर्व जगाला बरेच काही सांगितले आहे. सध्या या बेटवजा देशात चीनची जवळीक वाढली आहे आणि चीनने तेथे आपले लष्करी सामर्थ्य आणि सामरिक नीती जास्त पक्की केली आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण प्रशांत महासागरात चीनचा अगोदरच दबदबा वाढला असताना येथे घुसखोरी करण्याचा चीनचा इरादा लपून राहिलेला नाही. त्यामुळे मोदी यांची पीएनजीला भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याचे प्रत्यंतर मारापे यांच्या कृतीतून आलेच. चीनने या देशाशी जी जवळीक वाढवली आहे, त्यामुळे अर्थातच संपूर्ण प्रदेशातील सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या जवळीकीने सर्वात जास्त धोका अर्थातच भारताला आहे आणि त्यामुळे मोदी यांनी पीएनएला भेट दिली, त्याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत. पीएनएने मोदी यांच्यासाठी आपली वर्षानुवर्षाची परंपराही मोडली. त्या देशात सहसा आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचे स्वागत सायंकाळनंतर करत नाहीत. पण पीएनएचे प्रमुख मारापे सायंकाळी मोदी यांच्या स्वागताला खास हजर राहिले, त्यांच्या पाया पडले आणि मोदी यांनी त्यांना आलिंगनही दिले. ही एक साधी कृती होती, पण त्याने चीनला हादरा दिला आहे. सोमवारी मोदी आणि मारापे यांची एक द्विपक्षीय बैठक झाली असून त्यात उभय देशांनी संबंध मजबूत करण्यावर भर दिला.
इतकी वर्षे या विषयाकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत होते. गेली काही वर्षे आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे क्षितीज केवळ अमेरिका आणि पाकिस्तान, चीन या देशांपुरतेच मर्यादित राहिले होते. त्याचा विस्तार करण्याचे काँग्रेसी पंतप्रधानांना कधी सुचलेही नाही. त्यामुळे मोदी यांचे हे नवनवे आंतरराष्ट्रीय डावपेच काँग्रेसवाल्यांच्या डोक्यात लवकर शिरणार नाहीत. ते केवळ मोदींना ट्रम्प यांनी कशी मिठी मारली, त्याचेच वर्णन असुयेने करत राहतील. पीएनजीबरोबर संबंध नव्या उंचीवर नेण्याचे काम ही भेट करणार आहे. ज्या भारताची प्रतिमा केवळ साप आणि हत्तींचा देश अशी होती, त्याचा आंतरराष्ट्रीय प्रभाव गेल्या आठ – नऊ वर्षांत सर्वदूर वाढला आहे, हे कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो. तो विरोधकांकडे असणे शक्य नाही. पण लोकांना ते चांगले समजते. पीएनजी हा साधनसंपत्तींनी भरपूर असा पॅसिफिक महासागरातील बेटवजा देश आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंध वाढवण्यामुळे भारताला लाभ होणार आहे.
मोदी यानंतर जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांना भेट देणार आहेत. पण त्या देशांच्या भेटीपेक्षाही या भेटीचे महत्त्व जास्त आहे. हवामान बदल आणि शाश्वत विकास या दृष्टीनेही ही भेट महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येते. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी असेच वक्तव्य केले आहे. मोदी यांच्या मारापे पाया पडले, त्यावरून एक प्रसंग आठवला. साल होते १९८३. त्यावेळी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. क्युबाचे प्रमुख फिडेल कॅस्ट्रो अलिप्त राष्ट्र चळवळीत भाग घेण्यासाठी भारतात आले होते. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे तीन वेळा केला असताना दुर्लक्ष केले आणि नंतर त्यांना जोरदार मिठी मारली.
त्याची छायाचित्र तेव्हाच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली होती. ते असो. आता मोदी जी पॅसिफिक बेट देशांना भेट देत आहेत, त्यात १४ देश सहभागी होत आहेत. त्यात भारताची भूमिका मोदींनी प्रभावीपणे मांडली आहे आणि त्याचा बराचसा उपयोग चीनपासून दूर जाण्यात झाला, तर मणिकांचन योग ठरेल. कारण चीनने ज्या ज्या देशांशी जवळीक साधली आणि त्यांना कर्जपुरवठा करून उद्ध्वस्त केले, त्यात अनेक देश आहेत. भारताचे शेजारी नेपाळ, श्रीलंका वगैरे देश यात मोडतात. पाकिस्तान तर अगदी जिवंत आणि जवळचे उदाहरण आहे. हे सारेच देश आज चीनच्या विस्तारवादी राजकारणामुळे भुकेकंगाल झाले आहेत. त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम चीनच्या राजवटीने केले आहे. तोच प्रयोग चीनने पॅसिफिक प्रदेशात केला होता. पण आता मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे सरकार आणि ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्या क्वाड आघाडीने तो धोका ओळखून चीनच्या या सागरी विस्तारवादास जोरदार अडथळा आणण्याचा निर्धार केला आहे आणि मोदी यांची पीएनजीची भेट ही त्यातील पहिली मोठी पायरी आहे.