-
सेवाव्रती: शिबानी जोशी
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ असं आपण म्हणतो. सुखात सर्वजण असतात; परंतु दुःखात, क्लेशात जो साथ देतो, तोच एक संवेदनशील व्यक्ती असं मानलं जातं आणि दुःखी, वंचित लोकांसाठी संघ कार्यकर्ते कायमच आपल्या क्षेत्रातील गरजा ओळखून उपक्रम हाती घेत आले आहेत. ठाणे शहरात संघ कार्यकर्ते अनेक वर्षे विविध कामं हाती घेत असतात. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असेच एकत्र जमले असताना काहीतरी वेगळं कार्य सुरू करायचं त्यांच्या मनात होतं. त्यावेळी ठाण्यात ४/५ रक्तकेंद्र कार्यरत होती, पण व्यवसाय करण्यासाठी; परंतु रक्ताचा व्यापार न होता रुग्णांना ‘सेवा’ म्हणून देता आलं पाहिजे, ही भावना ठेवून ठाणे शहर आणि जिल्ह्यात सचोटीने, वाजवी दरात आणि तातडीने रक्त उपलब्ध करून देणारी एखादी यंत्रणा आपण उभारावी, अशी या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मनात कल्पना आली. ठाण्यामध्येच प्रताप व्यायामशाळा सेवा संस्थेच्या जागेत व्यायाम शाळेची जागा आणि छोटी वास्तू होती. त्या ठिकाणी रक्तपेढीचं काम सुरू करायचं ठरलं आणि मग रक्तपेढीसाठी लागणारी यंत्रसामग्री, सर्व परवानग्या आणि आर्थिक मदत अशा तीन स्तरांवर कार्यकर्त्यांनी नेटाने काम सुरू केलं. प्रामाणिक कामाला नेहमीच मदतीचे हात सढळपणे पुढे येतात, त्यानुसार निधी संकलन आणि इतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली. हा गोवर्धन पर्वत उचलण्यात त्यावेळचे ज्येष्ठ संघ कार्यकर्ते भाऊ बापट, डॉ. शांताराम आपटे, माधवराव कुलकर्णी, ढवळीकर काका, कुलकर्णी काका, दत्ता जोशी, आर्किटेक्ट नंदू लेले, शशिकांत देशमुख, विकास गोखले, डॉ. निकते आणि महेश जोशी यांनी मोलाची कामगिरी केली.
रक्तकेंद्राचे उद्घाटन तेव्हाचे चिफ ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया वेंकटेश्वरुलू आणि रा. स्व. संघाचे क्षेत्र संचालक डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते झाले आणि पाच मजली इमारत उभी राहिली. ठाण्यातीलच संघाचे कार्यकर्ते वामनराव ओक यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी त्यांच्या नावाने हे रक्तदान केंद्र सुरू झालं. ३ मे २००७ साली ठाणे येथे रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून अॅडव्होकेट वामनराव ओक यांच्या नावाने रक्तपेढीची सुरुवात झाली. सुरुवातीला दोन डॉक्टर आणि पाच-सहा टेक्निशियन घेऊन कामाला सुरुवात केली. रक्त केंद्राचे प्रमुख कार्य म्हणजे रक्त संकलन, त्यानंतर त्या रक्ताचा योग्य ठिकाणी विनिमय करणे हे आहे. अनेक सार्वजनिक मंडळ, मोठ मोठ्या कंपन्या, सरकारी कार्यालय, बँक कर्मचारी रक्तदान शिबिराचं आयोजन रक्तपेढीच्या सहकार्यानी आयोजित करतात, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन होतं. त्याशिवाय काही व्यक्ती स्वतःहून रक्तदानासाठी पुढे येतात. हे संकलित केलेले रक्त वाया जाऊ नये म्हणून त्याची अतिशय व्यवस्थित निगराणी करणं आवश्यक असतं. त्यासाठीची सर्व अत्याधुनिक सामग्री वापरली जाते. त्यानंतर गरज असलेले रुग्णालय किंवा रुग्ण रक्ताची मागणी करतात तसा त्यांना त्वरित आणि वाजवी दरात रक्ताचा पुरवठा केला जातो.
गरजू रुग्णांना विनामूल्य रक्तही वितरित केलं जातं. हळूहळू केंद्राचं काम वाढत गेलं तसा स्टाफही वाढला असून आता जवळजवळ २५ ते ३० जण इथे कार्यरत आहेत. यात चार डॉक्टर, १० तंत्रज्ञानांचा समावेश आहे. तत्कालीक उपचारासाठी रक्ताची गरज महत्त्वाची. ते वाजवी दरात त्वरित उपलब्ध व्हावे व औषधोपचाराविना कोणाच्याही घराताल दिवा विझू नये म्हणून जनकल्याण समितीतर्फे हा प्रकल्प हाती घेतला आणि अनेक अडचणींवर मात करून तो सिद्धीस नेऊन ही उपयुक्त अशी सुविधा येथे निर्माण केली. २००७ ते २०२३ या गेल्या १६ वर्षांमध्ये अनेक नवनवीन यंत्रसामग्री रक्तकेंद्रात दाखल झाल्या. एफडीए आणि एसबीटीसी या दोन सरकारी नियंत्रण असलेल्या संघटनांची मान्यता घेऊनच हे सर्व कार्य अत्यंत प्रामाणिकपणे चालतं. असं संस्थेच्या कार्यवाह कविता वालावलकर यांनी सांगितलं. थेलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांना रक्ताची वारंवार गरज पडते आणि ते खूप महागही पडतं, त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अशा रुग्णांना संपूर्ण रक्त विनामूल्य दिलं जातं. वर्षाला साधारण सात ते आठ हजार पिशव्या रक्त संकलित केलं जातं. रक्त हे नाशिवंत असल्यामुळे ते ३०-३५ दिवसांत वापरावं लागतं आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालणंही महत्त्वाचं ठरतं. एखाद्याने मनापासून केलेलं रक्तदान फुकट जाता कामा नये, यासाठी तो ताळमेळही रक्तपेढीत राखला जातो. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण व ठाणे शहरातील तसेच मुंबईतील रुग्णांना सुरक्षित रक्त पुरवण्यासाठी रक्तपेढी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अधिक सुरक्षित रक्त मिळण्यासाठी आता एलायजा टेस्टेड आणि नॅट टेस्टेड रक्ताची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. तसेच थॅलेसेमिया प्रकल्प सुद्धा रक्तपेढीने हाती घेतला आहे. ठाण्यातील रोटरी क्लबने एक व्हॅनही दिली आहे. या व्हॅनमध्ये एका वेळी तीन जणांना रक्तदान करता येऊ शकतं. ठाणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र सुद्धा खूप मोठं आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या सहाय्याने सध्या शहापूर तालुक्यात थॅलेसेमीया चाचणी सुरू आहे. गोरगरिबांना त्यांच्या गावाजवळ रक्त उपलब्ध व्हावं यासाठी शहापूर येथे साई स्टोरेज सेंटर, वाडा येथे चंदावरकर हॉस्पिटलमध्ये रक्त साठवणूक केंद्र सुरू झाली आहेत. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरित रक्त उपलब्ध होत आहे. याशिवाय केंद्रातर्फे विविध शिबिरं, रक्तदानाचे महत्त्व आधारित करण्यासाठी रक्तदात्यांचे मेळावे आयोजित केले जातात.
आज रक्तकेंद्राने सेवेची १६ वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात २४ तास ३६५ दिवस सेवा पुरवली जात आहे. रक्तकेंद्र कधीही थांबले नाही, समाजातील दानशूर दात्यांच्या जोरावर आणि संघ स्वयंसेवकांच्या परिश्रामुळे आजपर्यंतचा टप्पा केंद्रानं पार केला आहे. यापुढे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त केंद्र सुरू करून ग्रामीण, तळागाळातील लोकांना सुलभपणे रक्त उपलब्ध करून देण्याचं ध्येय बाळगत जनसेवेचा वारसा घेऊन रक्तकेंद्राची भविष्यात वाटचाल सुरू राहणार आहे.