Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखविस्तारित ठाणे रेल्वे स्टेशन उभारणीला लवकरच सुरुवात

विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशन उभारणीला लवकरच सुरुवात

  • ठाणे डॉट कॉम : अतुल जाधव

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्टेशनची ओळख आहे. ठाणे रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने या रेल्वे स्थानकात लोकलसह मेल एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक होते.

दररोज पाच लाखांच्या आसपास रेल्वेप्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून ये-जा करत असतात. वाढत्या गर्दी मुळे ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दीचा ताण येतो, मागिल काहीं दिवसात ठाणे रेल्वे स्थानकावर होत असलेल्या गर्दीचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत असल्याने गर्दीची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने या गर्दीची दखल घेतली असून रोजच्या जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या लाखों रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणारा निर्णय घेतला आहे. विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनच्या कामाला आता गती मिळणार आहे. या विस्तारित रेल्वे स्थानकाचा पाच वर्षांत ६५ कोटींनी खर्च वाढला आहे; परंतु पावसाळ्यानंतर हे काम अतिशय जलद गतीने होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच केला असल्याने लवकरच विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठवला होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. या स्थानकाचे काम रेल्वेमार्फत करण्यात येणार असून ठाणे महापालिका रेल्वेला निधी देणार आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात त्यासाठी ११९.३२ लाख इतक्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मनोरुग्णालयाचा भूखंड आरोग्य विभागाच्या ताब्यात होता. हा भूखंड एका पारशी दानशूर व्यक्तीने रुग्णालयाकरिता दिला होता. त्याचा वापर इतर कारणासाठी करण्यात येणार असल्याने काही जणांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने भूखंड देण्यास स्थगिती आदेश दिला होता. तो आदेश मार्च २०२३ला उठवला होता, त्यामुळे कामाला विलंब झाला होता.

जागा हस्तांतरित करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे, त्यामुळे रेल्वेच्या कामातील अडथळे दूर झाले असून पावसाळ्यात रेल्वे प्रशासन निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर या रेल्वे स्थानकाचे काम गती घेईल, असा विश्वास महापालिकेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. खर्च वाढला आहे, त्याची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

हे रेल्वे स्थानक झाल्यास ठाणे रेल्वे स्थानकावरील किमान ३० टक्के ताण कमी होण्याची शक्यता आहे. घोडबंदर, वागळे, वर्तकनगर, कळवा, बाळकुम आणि ठाणे पूर्व भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यांच्या वेळेची बचत होऊन वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार आहे.

लोकल ट्रेनला मुंबईची लाइफलाइन असं म्हटलं जातं. लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात. मुंबईसह दादर, ठाणे, कल्याण यांसारख्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची अफाट गर्दी दिसून येते. मुख्यत्वे पश्चिम रेल्वे मार्गिकेपेक्षा मध्य रेल्वेवर प्रवाशांची तुफान गर्दी दिसून येते.

यासाठी भारतीय रेल्वेच्या इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या ठाणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा पूर्णपणे बदलण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

ठाणे स्थानकावरील वाढती गर्दी टाळण्यासाठी मध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. स्लो लोकलसाठी एक स्वतंत्र असं स्थानक उभारण्याचं नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे. खासगी वाहनधारकांना ठाणे स्थानकात पोहोचताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मध्य रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानक उभारण्यात येणार आहे. मनोरुग्णालयाची एकूण जागा ६ हेक्टर असून, यापैकी १.३ हेक्टर जागेत नव्या स्थानकाची उभारणी होणार आहे. नव्या ठाणे स्थानकामध्ये होम फलाटासह दुतर्फा तीन फलाट असतील. स्थानकात तीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून, यापैकी दोन पुलांची जोडणी फलाटांना आणि एका पुलाची जोडणी पूर्व-पश्चिम असेल. त्यासोबतच सरकते जिने, लिफ्ट या आधुनिक सुविधा फलाटांवर असणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड स्थानकातून दररोज ८०० हून अधिक लोकल फेऱ्या होतात. ठाण्यातून हार्बर, मुख्य आणि मेल-एक्स्प्रेससह एकूण १ हजार ३०० हून अधिक रेल्वे फेऱ्यांची हाताळणी होते. यामुळे नव्या ठाणे स्थानकात सध्याच्या ठाणे स्थानकातील धीम्या लोकल वळवून प्रवासी गर्दी विभागण्यात येणार आहे. जलद लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सध्याच्या ठाणे स्थानकातूनच चालवण्याचे नियोजन आहे; परंतु नव्या स्थानकासाठी अपेक्षित खर्च १८३ कोटी रुपये असून ठाणे स्मार्ट शहरांतर्गत स्थानक आणि परिसरासाठी २८९ कोटींची तरतूद आहे. तसेच हा संपूर्ण खर्च ठाणे महापालिकेकडून मध्य रेल्वेला देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून मनोरुग्णालयाची जमीन आणि ठाणे महापालिकेकडून निधीचा पहिला टप्पा वितरीत झाल्यावर रेल्वेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षांमध्ये या स्थानकाचे काम पूर्ण करण्यात येणार असून प्रवासी वाहतुकीसाठी नवे स्थानक खुले होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -