Monday, May 12, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

सर्व शाळांसाठी आता एकच गणवेश

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली घोषणा


मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय गणवेशाबाबत आज एक मोठी घोषणा केली. राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांचे गणवेश हे एकच असतील व या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ती घोषणा आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली 'एक राज्य, एक गणवेश' ही संकल्पना यावर्षीपासून अस्तित्त्वात येणार आहे.


राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मोफत गणवेशासाठी निधीची तरतूद केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्वच शाळांचा एकाच प्रकारचा गणवेश असेल असा निर्णय दिला आहे. या गणवेशात मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट असेल. यामुळे राज्यातील ६४,२८,००० विद्यार्थी आता एकाच गणवेशात दिसतील.


यावर्षीपासून राज्य सरकार ही संकल्पना अस्तित्त्वात आणत आहे. मात्र काही शाळांनी आधीच गणवेशाची ऑर्डर दिल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार व बुधवार त्यांच्या शाळांनी नियोजित केलेला गणवेश घालावा लागेल व नंतरचे तीन दिवस म्हणजे गुरुवार, शुक्रवार व शनिवार राज्याचा एक गणवेश घालावा लागेल, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Comments
Add Comment