Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वनवीन शेअर्स खरेदीसाठी ‘वेट अँड वॉच’

नवीन शेअर्स खरेदीसाठी ‘वेट अँड वॉच’

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात सलग वाढीनंतर लगाम लागलेला दिसला. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे टेक्निकल बाबींकडे पाहता निर्देशांक उच्चांकाला आलेले आहेत. पुढील आठवड्यासाठी घाई गडबड न करता योग्य संधीची वाट पाहणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची १८०५० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या वर आहेत तोपर्यंत निर्देशांकातील तेजी कायम राहील. टेक्निकल अॅनालिसीसनुसार डाटामॅटिक्स, सीजी पॉवर, सायंट यासह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. मध्यम तसेच दीर्घमुदतीचा विचार करता ‘एफएसएल’ या शेअरने १२३ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज १३४ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. शेअर खरेदी करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर अत्यंत आवश्यक आहे. मी माझ्या मागील ८ एप्रिल २०२३ च्या लेखात मध्यम मुदतीचा विचार करता ‘अपटेक लिमिटेड’ या शेअरने ३८८ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ४११ रुपये किंमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये मध्यम मुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होवू शकेल हे सांगितलेले होते. मागील आठवड्यात ‘अपटेक लिमिटेड’ या शेअरने ४९५ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर जवळपास २१ टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये झालेली आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार अल्प मुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा मंदीची झालेली आहे. सोने जोपर्यंत सोने ६१५०० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी येणार नाही. अल्प मुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गती मंदीची आहे. टेक्निकल अॅनालिसीसनुसार जोपर्यंत चांदी ७६००० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत चांदीमधील मंदी कायम राहील. फंडामेंटल अॅनालिसीस केल्यावर तुम्हाला निर्देशांक महाग आहे की स्वस्त आहे याचा अंदाज येत असतो. साधारणपणे ज्यावेळी निर्देशांक हा महाग असतो त्यावेळी त्याला आपण निर्देशांक ‘ओवर व्हॅल्यू’ झाला असे म्हणत असतो. निर्देशांक ‘ओवर व्हॅल्यू’ असताना कमीत कमी जोखीम पत्करून अल्पकाळासाठी गुंतवणूक करणे आवश्यक असते व दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर मात्र टप्प्याटप्प्याने सातत्याने शेअर खरेदी करत राहणे आवश्यक असते. निर्देशांकाचे मूल्य हे जर स्वस्त असेल तर आपण निर्देशांक हा ‘अंडर व्हॅल्यू’आहे असे म्हणतो. निर्देशांक ‘अंडर व्हॅल्यू’ असताना मध्यम तसेच दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होत असतो. शेअर बाजारामध्ये दीर्घमुदतीसाठी शेअर खरेदी करावयाची असेल तर योग्य शेअर निवडून पैशाचे योग्य नियोजन करून सातत्याने शेअर खरेदी करणे आवश्यक असते. सध्या निर्देशांक महाग झाले असून निर्देशांकाचा पी ई रेशो २१ च्या पुढे आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये शांत राहून आपला पैसा आपल्याच हातात ठेवून ‘वेट अँड वॉच’ हाच पर्याय उत्तम.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -