पुढील न्यायालयीन सुनावणी ८ जूनला
मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबई हायकोर्टानं समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. मुंबई कोर्टानं वानखेडे यांना ८ जुन पर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी ८ जून रोजीच होणार आहे.
आर्यन खान प्रकरणात सीबीआयने शनिवारी त्यांची सुमारे ५ तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर वानखेडे सीबीआय कार्यालयातून बाहेर आले तेव्हा ते माध्यमांच्या प्रश्नांवर ‘सत्यमेव जयते’ म्हणत पुढे निघून गेले होते. त्यानंतर आता त्यांना अटकेपासून पुन्हा एकदा संरक्षण मिळाले आहे. वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांना आजपर्यंत म्हणजेच, २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली आहे.
दरम्यान, वानखेडे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्याला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संरक्षण मिळावे, अशी मागणी वानखेडे यांनी कोर्टाकडे केली आहे. यापूर्वी वानखेडे यांनी माध्यमांना आर्यन खान केस प्रकरणातील काही गोष्टी शेयर केल्या होत्या. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. यावेळी कोर्टानं त्याकडेही लक्ष वेधले आहे.