नितेश राणे यांनी डागले टीकास्त्र
कणकवली: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत यांना उद्देशून बोलत त्यांनी सर्वात मोठा जादूटोणा करणारा तुझा मालक उद्धव ठाकरे आहे, असं म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होत आहे. त्यावरही नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, त्या दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांनी आपले पंतप्रधान मोदी यांनी मान सन्मान देताच तो त्या देशाचा पंतप्रधान जादूटोणा करतो असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. पण संजय राऊत सर्वात मोठा जादूटोणा करणारा तुझा मालक आहे. काळी जादू करून ठाकरेंनी काय काय केलं हे आम्हाला माहीत आहे. मातोश्रीच्या मागील भागात जेसीबीने खोदून लिंब का टाकले याची माहिती द्यावी का?, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
कर्जत फार्महाऊसवर किती नरबळी दिले?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार नाहीत. तर त्यांची पत्नी मुख्यमंत्री बनू शकतात, असं एका बुवाने सांगितलं होतं. म्हणून त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती. कर्जतच्या फार्महाऊसवर किती नर बळी दिले गेले याची माहिती घ्या, असे म्हणत नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नाना पटोले यांचा डी. के शिवकुमार करणार
त्यांनी संजय राऊत यांच्यावर आणखी जहरी टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरेंचे पगारी कामगार संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या अप्रत्यक्ष थोबाडीत मारलं आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसीतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक झाली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यात ती बैठक झाली. त्यात जास्त जागा आपण घ्यायच्या आणि उरलेल्या जागा काँग्रेसला द्यायचं अस ठरलंय. काँग्रेसचा कार्यक्रम करण्याचे अटळ आहे, असा सुचक इशाराच नितेश राणे यांनी काँग्रेसला दिला आहे. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेसने डी. के शिवकुमार यांच्यासोबत केले ते नाना पटोलेंसोबत होणार आहे असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.
उद्धव, आदित्य आणि राऊत यांचे रक्त भगवे आहे का?
उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचे रक्त भगवे आहे का हे पाहावं लागेल, असाही टोला नितेश राणे यांनी हाणला. अजितदादा पवार यांची डीएनए टेस्ट करण्याचे वक्तव्य करण्याची हिंमत संजय राऊत यांच्यात आहे तसेच पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या टोळीला आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांकडून जो सन्मान मिळाला तो कधी हजम होणार नाही, असंही टीकास्त्र नितेश राणे यांनी डागलं आहे. सन्मान मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो अशी खोचक टीकाच नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि गटाची करत एकंदरीतच त्यांचे वाभाडे काढले आहेत.