-
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे
उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जीवन शैलीशी निगडित आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात; परंतु योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित योगा आणि व्यायाम करणे किती आवश्यक आहे हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जगभरात उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे चार व्यक्तींपैकी एकाला उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दरवर्षी ‘१७ मे’ हा दिवस ‘जागतिक उच्च रक्तदाब’ किंवा ‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’ म्हणून पाळला जातो. या दिवशी लोकांमध्ये उच्च रक्तदाबाबत जनजागृती केली जाते.
लोकांमध्ये या व्याधींचे वाढते प्रमाण पाहता मुंबई महानगरपालिकेने देखील काही काळापूर्वी या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने अधिकाधिक दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा मुंबईकर नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून मुंबई उपनगरांमध्ये व्यक्तींचे सर्वेक्षण करून उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आरोग्य व वैद्यकीयविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देतानाच आरोग्यविषयक जनजागृतीचेही कार्य देखील महापालिकेकडून केले जात असते. याच अानुषंगाने सध्याच्या धावपळीच्या व बदलत्या जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या रक्तदाब व मधुमेह अशा आजारांबाबतही सातत्याने जाणीव जागृती करण्यात येते. लठ्ठपणा, आहारातील मिठाचा अतिवापर, धुम्रपान व मद्यपान, ताण-तणाव आणि कोलेस्ट्रॉलच्या अतिउच्च पातळीमुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडण्याची शक्यता असते; परंतु योग्य उपचार पद्धती आणि जीवनशैलीत बदल केले तर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रोजच्या आहारातील मिठाचे प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा कमी ठेवणे, पुरेशी झोप व विश्रांती घेणे, आहारात फळे, भाज्या असणे व कमी चरबीयुक्त अन्नाचे सेवन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदाबाची नियमित तपासणी करणे या गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतात. सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित हृदयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ वाटणे ही उच्च रक्तदाबाबची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे वेळीच निदान होऊन या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय औषधोपचार मिळावेत, यासाठी महापालिका सातत्याने विविधस्तरिय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ४ जानेवारी २०२३ पासून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी आरोग्य सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने मुंबई उपनगरांसह झोपडपट्ट्यांच्या भागात लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात घरोघरी भेट देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे स्क्रीनिंग केले जाते. या सर्वेचा सध्या १९ वा टप्पा पूर्ण झाला आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका आणि आशा सेविकांनी २४ प्रभागांमधील झोपडपट्टी भागात हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ व्या टप्प्यापर्यंत २४ प्रभागांमधील तब्बल २ लाख ६१ हजार १८५ घरांना भेटी देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ४ लाख ४५ हजार ५४९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. नमुना पद्धतीने ही तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी २९ हजार ६२४ उच्च रक्तदाबाचे संशयित रुग्ण आढळून आले. सर्वेक्षणाच्या १९ व्या टप्प्यानंतर महापालिका क्षेत्रात ६२ हजार ३९१ नागरिकांना आधीपासूनच उच्च रक्तदाब असल्याचे असल्याचे आढळून आले आहे.
२ ऑगस्ट २०२२ ते ६ मे एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण १५ तपासणी केंद्रात १ लाख ३७ हजार ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील १४ हजार ३४२ उच्च रक्तदाबाचे संशयित रुग्ण आढळून आले. तर १४ हजार ६८३ मधुमेहाचे संशयित रुग्ण आढळून आले. शिवाय ५ हजार ५८९ रुग्णांना दोन्ही म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह संशयित असल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२३ मध्ये ३० वर्षापेक्षा जास्त वयाच्या २३ हजार ७१४ व्यक्तींनी महापालिकेच्या दवाखान्यातून उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करून घेतली आहे, तर महापालिकेच्या आपला दवाखान्यातून ५३ हजार ५५७ रुग्णांनी तपासणी करून घेतली आहे. या तपासणी केंद्रांमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना अधिकाधिक प्रभावी वैद्यकीय औषधोपचार दिले जातात.
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांचे वेळीच निदान होऊन त्यांना प्रभावी उपचार मिळावेत यासाठी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन नागरिकांची पूर्व तपासणी करणे, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचार पद्धतीचा अवलंब करणे तसेच रुग्णांकरिता दक्षता आणि देखरेख प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून या रुग्णांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने एकूण १५ रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू केली आहेत. येथे रुग्णांची तपासणी व पाठपुरावा करून त्यांना पुढील रुग्णालयात संदर्भीत करण्यात येते. या सर्व गोष्टी जरी लक्षात घेतल्या तरी मधुमेह, उच्च रक्तदाब होऊ नये यासाठी आपल्यालाही बरेच काही करता येऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणतणावापासून दूर राहणे, ताण दीर्घकाळासाठी शरीरात राहिल्याने त्याचे हळूहळू दुष्परिणाम शरीराला जाणवायला लागतात आणि त्यामुळे शरीरात डायबिटीस, संधिवात, सोरायसिस, हायपर टेन्शन, ॲसिडिटी या व्याधी बळावू लागतात. ताणाचा त्रास हा महिलांना मोठ्या प्रमाणात होतो. ताणतणावामुळे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होत असतात. या हार्मोन्समुळे आपल्या हृदयाची स्पंदने गतिमान होतात आणि रक्तवाहिन्या निमुळत्या होतात. थोडक्यात काय तर दोन इंचाच्या पाइपमधून चार इंच पाणी वाहायला लागते व त्यामुळे त्यांचा दाब जास्त होतो आणि कालांतराने त्याचे रूपांतर हायपरटेंशनच्या आजारात होते. ताणतणावामुळे बीपीचा त्रास चढतो पण ताणतणावाला योग्य पद्धतीने तोंड देऊ शकल्याने हायपर टेन्शन होते. डॉक्टरांनी सांगितलेले पथ्यपाणी व गोळ्या औषधांबरोबरच उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ताणतणावाला योग्य पद्धतीने तोंड द्यायला शिकणे देखील खूप महत्त्वाचे आहे. वर्तमान क्षणात जगायला शिकायला हवं यासाठी ध्यान, योग, प्राणायाम खुल्या श्वासाचे व्यायाम याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांची भावनांची आणि शारीरिक संवेदनांची अधिक चांगली जाणीव होते. आपल्याला त्रास होऊ न देता या संवेदनांचे
नियोजन करावे अधिक सोपे जाते. याने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायला खूप फायदा होतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने देशवासीयांना सांगितले व योगा किती फायद्याचा आहे आणि तो काय चमत्कार करू शकतो हे योगाने दाखवून दिले. योगा केल्याने बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. म्हणजेच काय नियमित व्यायाम, पथ्य पाणी, योग व सकस व संतुलित आहार घेतला व आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःला दिवसाचा काही वेळ दिला, तर उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारख्या व्याधींना काही काळ तरी आपण दूर ठेवू शकतो हे नक्की!