देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना प्रत्युत्तर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. याला आता ९ तास उलटल्यानंतर त्यांची सुटका झाली आहे मात्र, काही कागदपत्रे ईडीसमोर सादर न केल्याने त्यांना त्या कागदपत्रांसह उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. ईडीचे तीन अधिकारी जयंत पाटलांची चौकशी करत होते अशी माहिती मिळाली आहे. आयएल आणि एफएलएस प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे.
आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर पाहायला मिळाली. ईडी चौकशीविरोधात मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर तंसच इतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन केले. बरेच पदाधिकारी इतर ठिकाणांहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असं आवाहन जयंत पाटील यांनी केले होते.
तर, घाबरण्याचं कारण नाही…
दरम्यान, विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपा केंत्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षाच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचं काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादं प्रकरण असेल म्हणून त्यांनी पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं असेल. जर पाटलांचा या खटल्याशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही.