- अर्थसल्ला : महेश मलुष्टे, चार्टर्ड अकाऊंटंट
आज शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील आयकर आकारणी याबाबत थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
इक्विटी शेअर्सवरील आयकर आकारणी
इंट्राडे ट्रेडिंग : डिलिव्हरी घेण्याच्या उद्देशाशिवाय तुम्ही त्याच दिवशी इक्विटी शेअर्सची खरेदी आणि विक्रीचा व्यापार करत आहात तर, त्यामधून मिळणारे उत्पन्न हे ‘सट्टा’ मानले जाते व तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येत आहात त्यानुसार त्यावर आयकर आकाराला जातो. आयकर कलम ४४ एडी अंतर्गत अशा प्रकारच्या व्यवहारातून जर उलाढाल २ कोटी रु. पेक्षा जास्त असेल किंवा करदात्याचे नुकसान झाले असेल तर ‘टॅक्स ऑडिट’ करून घेणे अनिवार्य असते.
शॉर्ट टर्म ट्रेडिंग : एका दिवसापासून ते १२ महिन्यांपर्यंत जर इक्विटी शेअर्स मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी/ विक्री केले असल्यास व त्यावर एस.टी.टी भरलेला असेल तर लाभावर १५% इतका आयकर भरावा लागतो. आयकरची गणना करताना कलम ८०सी ते ८० यूमधील कपाती करण्याची परवानगी नसते याची नोंद घेणे गरजेचे आहे.
दीर्घकालीन गुंतवणूक : कलम ११२ ए नुसार जर इक्विटी शेअर्स १२ महिने मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी/विक्री केले असल्यास व त्यावर एस.टी. टी. भरलेला असेल तर पहिल्या रु. १ लाखावर शून्य टक्के आणि १ लाखपेक्षा जास्त उत्पन्नावर १०% इतका आयकर भरावा लागतो.
म्युच्युअल फंडांवरील आयकर आकारणी
इक्विटी म्युच्युअल फंड : इक्विटी म्युच्युअल फंडांसाठी, इक्विटी शेअर्स प्रमाणेच नियम लागू होतात. अशा प्रकारे, इक्विटी म्युच्युअल फंडांवर अल्पकालीन भांडवली नफ्यासाठी, तुम्हाला १५% इतका आयकर लागतो आणि दीर्घकालीन नफ्यावर १ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर १०% आयकर आकारला जाईल.
डेट म्युच्युअल फंड : जर १ एप्रिल २०२३ च्या आधी केलेल्या डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील आयकर देखील होल्डिंग कालावधीवर अवलंबून असतो. तथापि ३ वर्षांच्या आत झालेला नफा हा अल्प-मुदतीचा मानला जातो आणि तीन वर्षांवरील नफा दीर्घकालीन मानला जातो. २०२३ च्या आर्थिक संकल्पानुसार, १ एप्रिल २०२३ नंतर केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला लागू असलेल्या स्लॅब दरांनुसारच आयकर आकारला जाईल; परंतु इंडेक्सेशनचा फायदा उपलब्ध असणार नाही.
हायब्रीड म्युच्युअल फंड : हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखाली ६५% पेक्षा जास्त मालमत्ता ही इक्विटीमध्ये गुंतवली गेल्यास, नफ्यावर इक्विटी म्युच्युअल फंडाप्रमाणेच आयकर आकारला जातो आणि जर ६५% पेक्षा कमी रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली असेल, तर नफ्यावर डेट म्युच्युअल फंडाप्रमाणे आयकर आकारला जातो.
गोल्ड म्युच्युअल फंड : गोल्ड म्युच्युअल फंडावरील कराचा दर डेट म्युच्युअल फंडांसारखाच असतो. तुम्हाला गोल्ड म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या नफ्यावर स्लॅब दराने आयकर आकारला जाईल.
डेरीवेटिव्ह एफ अँड ओ (Future and Option) वरील आयकर आकारणी :
सर्व एक्स्चेंजेसवरील एफ अँड ओ ही साधने हेजिंगसाठी वापरली जातात आणि अंतर्निहित करारांची डिलिव्हरी घेण्यासाठी/देण्यासाठी देखील वापरली जातात म्हणून ह्यातील ट्रेडिंगमधून मिळणारे उत्पन्न हे सट्टा नसलेले व्यवसाय उत्पन्न म्हणून मानले जाते. जरी सध्या भारतातील जवळपास सर्व इक्विटी चलन आणि कमोडिटी करार रोखीने सेटल केलेले जातात; परंतु व्याख्येनुसार, ते डिलिव्हरी देणे/घेणे (सोन्यासारखे काही कमोडिटी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि जवळपास सर्व अॅग्री-कमॉडीटी कॉन्ट्रॅक्ट्स त्याला वितरण पर्याय आहेत). अल्प-मुदतीच्या इक्विटी डिलिव्हरी आधारित ट्रेड्समधून मिळणारे उत्पन्न (१ दिवस ते १ वर्षाच्या दरम्यान आयोजित) देखील गैर-सट्टा व्यवसाय उत्पन्न म्हणून विचारात घेतले जाते. सट्टा आणि सट्टा नसलेल्या व्यवसायाचे उत्पन्न तुमच्या इतर सर्व मिळकतींमध्ये (पगार, इतर व्यवसायाचे उत्पन्न, बँकेचे व्याज, भाड्याचे उत्पन्न आणि इतर) तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येतात त्यानुसार आकारले जाते.शेअर बाजारात केलेली गुंतवणूक अधिक जोखमीची असते, त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्याआधी संपूर्ण दस्तावेज वाचणे गरजेचे आहे.