फाफ डु प्लेसीसने दिली कबुली
बंगळूरु (वृत्तसंस्था) : गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रविवारी पराभूत झाल्यामुळे बंगळूरुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या शुभमन गिलच्या खेळीने सामना आमच्यापासून दूर नेला, अशी नाराजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने व्यक्त केली.
सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार म्हणाला की, पराभवामुळे आम्ही खूप निराश झालो. आम्ही मजबूत संघ घेऊन खेळलो. शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावात मैदान ओले झाले होते. अनेकदा चेंडू बदलावा लागला. विराट कोहलीने अविश्वसनीय खेळी खेळली. आम्हाला वाटले, की आम्ही चांगली धावसंख्या उभारली आहे. पण शुभमन गिलने चांगला खेळ करून सामना आमच्यापासून दूर नेला. फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, टॉप-४चे फलंदाज चांगले खेळले. पण संपूर्ण हंगामात मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये. कोहली संपूर्ण हंगामात चमकदार खेळला.
फाफ पुढे म्हणाला की, दिनेश कार्तिकने गेल्या वर्षी शानदार फलंदाजी केली आणि शेवटी धावा केल्या. पण या हंगामात तो तसे करू शकला नाही. जर तुम्ही यशस्वी ठरलेल्या संघांवर नजर टाकली, तर त्यांच्याकडे पाच आणि सहाव्या क्रमांकावर उत्कृष्ट हिटर फलंदाज आहेत.