बलिया : गंगेसारख्या पवित्र ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात. सोमवारी सकाळीदेखील दशक्रिया विधीसाठी लोक गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ आले होते. मात्र विधी उरकून परतताना अनपेक्षितपणे मोठी दुर्घटना घडली. या प्रवाशांना घेऊन जाणारी नाव अचानक पाण्यात उलटल्याने अपघात झाला.
उत्तर प्रदेशच्या बलिया येथे पेफना पोलीस ठाणे परीक्षेत्रातील माल्देपूर घाटाजवळ ही दुर्घटना घडली. एका बोटमधून ४० जण प्रवास करत होते. त्यामध्ये, ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्दैवाने अद्याप किती जण बेपत्ता झाले आणि बुडाले आहेत याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. त्या लोकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.
नाव उलटल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. काहींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढले, तर ज्यांना पोहायला येत होते, तेही स्वत;हून बाहेर आल्याने बचावले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.