
मूळ नांदेड येथील पावडेवाडीचे ते रहिवासी आहेत. पुणे-मुंबईसारख्या मेट्रो शहरात आयटी इंजिनीअर असलेल्या या दाम्पत्याने १५ वर्षे नोकरी केली. महिन्याकाठी दोघांना मिळून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये पगार मिळत होता. परंतु शेतीच्या माध्यमातून वेगळा व्यवसाय सुरु करण्याच्या त्यांच्या स्वप्नामुळे त्यांना पैशाची भुरळ पडली नाही.
यासाठी त्यांनी हैदराबाद येथे वास्तव्यास असताना शेतीविषयक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी शेवग्याच्या शेंगांची लागवड करायचे ठरवले. शेवग्याचे औषधी गुणधर्म, फायदे या सगळ्याची माहिती घेऊन ते आपल्या गावी परतले. तिथे त्यांनी शेवग्याची शेती सुरु केली मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून या दाम्पत्याने या शेतीतूनच संशोधनकार्य सुरु केले आणि त्यातून मोरिंग्या पावडरची निर्मिती केली.
ही पावडर मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. ही पावडर ते प्रतिकिलो एक हजार रुपये या दराने विकतात. डॉक्टर आणि अनेक व्यावसायिकांकडून या पावडरला प्रचंड मागणी आहे. पावडे जोडपं यातून महिन्याकाठी जवळपास दीड लाख रुपये कमावतं. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत.
पावडर तयार करण्याची प्रक्रिया
शेवग्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीन महिन्यानंतर पाला उपलब्ध होतो. त्यानंतर पाला तोडून, तो एकत्र करुन भिजत घालतात. निर्जंतुकीकरण करण्यासाठी लिंबाची पानं आणि मीठ देखील योग्य प्रमाणात टाकलं जातं. त्यानंतर दोन ते तीन दिवस पाला सुकण्यासाठी ठेवला जातो. पाला पूर्ण सुकल्यानंतर मशीनमधून बारीक करुन पावडर तयार केली जाते. त्यानंतर पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलोप्रमाणे पॅकिंग करुन ऑर्डरप्रमाणे विक्री केली जाते.