कणकवली (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या विधानसभेची चर्चा झाली. आघाडीतील तिन्ही पक्षांनी समान प्रत्येकी ९६ जागा लढवायच्या असे ठरविण्यात आले. तशी चर्चा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओक येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. पूर्वी शिवसेना १२२ जागांवर लढवली तेव्हा ५४ आले. आता उबाठा सेना ९६ जागा लढवून २० तरी निवडून येणार आहेत काय?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सिल्वर ओकमध्ये उद्धव यांना साधी खुर्चीसुद्धा दिली नाही. साध्या सोफ्यावर आणले. ते महाविकास आघाडीचे नेते उद्धव यांना जागा वाटपात काय न्याय देतील?, असा सवालही यावेळी आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला. उद्धव यांनी ९६ जागा मान्य नाहीत, असे सांगितले तेव्हा पुढच्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले, अशीही माहिती आ. नितेश राणे यांनी दिली.
ते आ. नितेश राणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शिल्लक सेनेने १८ जागांवर लढणार, असे सांगितले आहे. हा आवाज दाखवला तो किती काळ राहतो. शकुनी मामा खासदार संजय राऊत यांनी आधी आपल्या मालकाचे राजकीय वजन तेव्हढे आहे काय हे पाहावे.
सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या उपस्थितीत जागावाटप ठरले, तेव्हा ठाकरे-राऊत यांनी मान्य म्हणून सांगितले आणि आता मान्य नाही म्हणत आहेत. त्या बैठकीत राऊतना जीभ आवरा, वातावरण बिघडवू नका, असे सांगितले, तरीही शकुनी मामाच्या रोलमधून राऊत बाहेर येत नाही. काड्या घालण्याचे काम सुरूच आहे. ते पुढे म्हणाले की, २०१४ ते २०१९ मध्ये जे शिवसेनेचे मंत्री झाले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ठाकरे यांच्या कोट्यातून जी मंत्रीपदे दिली, त्यांनी किती खोके दिले, ते आधी सांगा. मातोश्रीवर किंवा कर्जतच्या फार्म हाऊसवर कोणी कोणी किती खोके पोहचविले, हे जाहीर करण्याची वेळ आणू नका. आता २००० रुपयांची नोट बंद झाली, तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसमधील जमिनीमध्ये पुरून ठेवलेले पैसे त्यातील दोन हजाराच्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न ठाकरे कुटुंबीयांसमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे कर्जतच्या फार्म हाऊसवर खोदकाम करण्याची वेळ आणू नका, असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले की, तुमच्या मालकाचे नंदकिशोर चतुर्वेदीकडे असलेले पैसे कधी आणणार ते आधी सांगा, मग काळा पैसा या विषयावर बोलू. पाटणकर लंडनमध्ये मध्यंतरी का लपून राहिला होता? ते सांगण्याची वेळ आणू नका़ राज्यात दहशतवाद थांबला, अमली पदार्थांविरोधी कारवाई झाली. अमली पदार्थ विक्री थांबली. हे मोदी सरकार आल्यामुळे शक्य झाले आहे. काश्मीर स्वतंत्र झाले, राम मंदिर उभे राहिले मात्र दंगल आणि आतंकवाद घडविण्याची हिंमत झालेली नाही, हा मोदी सरकारचा परिणाम आहे.
निष्ठावंत शिवसैनिक खरे बोलला. त्याला हाकलून दिले. ज्यांनी सोफा आणि एसीसाठी पैसे घेतले, त्यांना पाठीशी घातले. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि असंख्य शिवसेनेतील नेते जे उद्धव यांना सोडून गेले ते याच भ्रष्टाचारावर बोलत होते. निष्ठावंत यांची हकालपट्टी करून भ्रष्टाचाऱ्यांना खुर्ची देण्याची रीत आता मातोश्रीवर निर्माण
झालेली आहे.
सुषमा अंधारे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून बीड जिल्हाध्यक्षाची केलेली हकालपट्टी याविषयी आमदार नितेश राणे यांनी समाचार घेतला.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ठाकरे अनुपस्थित राहणार याविषयी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, २००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याची चिंता लागली आहे. त्या चिंतेत उद्धव आहेत, त्यामुळे ते काही दिवस तरी मातोश्रीच्या बाहेर येणार नाही.
आम्ही सर्वच मुसलमानांच्या विरोधात नाही. मात्र देश विरोधात काम करणारे, धर्मांध मुसलमान आहेत त्यांच्याविरोधात आहोत. देशाभिमानी अनेक चांगले मुसलमान या समाजात आहेत. अशा लोकांसमवेत आमचे स्नेहाचे संबंध आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले.