-
कथा: प्रा. देवबा पाटील
शहापूर नावाच्या एका गावात किसन व पुंजाबाई नावाचे एक जोडपे दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत आपल्या गावच्या सर्जेराव जमीनदाराच्या शेतात राबत असत. या जोडप्याला पांडू नावाचा एक मुलगा होता. किसनच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पांडूला बालपणापासूनच शेतमजुरीची छोटी-मोठी कामे करावी लागायची. त्यामुळे तो साऱ्या शेतकामात तरबेज झाला होता.
एकदा उन्हाळ्याचे दिवस संपता संपता पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्याची पेरणीसाठी नांगरटी वखरणीची कामे करण्याची धांदल सुरू झाली. त्याच दिवसात रामरावाच्या मालकाच्या मळ्यामध्ये असेच काही तरी महत्त्वाची कामे सुरू होती. रामराव व काही गडीमाणसे दररोज सकाळीच शेतावर कामाला जायची. त्या सर्वांच्या न्याहाऱ्या व दुपारच्या भाकरी नेण्यासाठी मळ्यातून बैलगाडी घेऊन दररोज एक गडी घरी यायचा. तो सगळ्यांच्या न्याहाऱ्या व दुपारच्या भाकरी प्रत्येकाच्या घरी जाऊन जमा करून करून आणायचा व त्या घेऊन आपली बैलगाडी जुंपून पुन्हा शेतावर जायचा.
असाच एके दिवशी तो गडी किसनच्या घरी आला. त्याने पुंजाबाईजवळून किसनची भाकरी व न्याहारी घेतली. नंतर इतरांच्या आणण्यासाठी तो तेथून बाकीच्या माणसांच्या घरी जायला निघणार एवढ्यात त्याची पत्नी तेथे आली व तिने त्याच्या जवळच्या नातेवाइकाच्या निधनाची दु:खद वार्ता त्याला सांगितली.
त्या गड्याला मोठा पेच पडला. पण पांडूने तो प्रश्न सोडविला. तो म्हणाला, ‘काका, तुम्ही काही काळजी करू नका. आज न्याहाऱ्या व भाकरी गोळा करून मी मळ्यावर घेऊन जातो.’
गड्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने पुंजाबाईंकडे पाहिले. पुंजाबाईला पांडूचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी त्या गड्याला जमीनदारीनीस विचारून त्याच्या पत्नीसोबत जाण्यास सांगितले व जमीनदाराच्या मळ्यात पांडूला न्याहाऱ्या नि भाकरी नेण्याची परवानगी दिली.
पांडूने सगळ्यांच्या घरून न्याहाऱ्या व भाकरी गोळा करून घरी आणल्या. जमीनदारांच्या घरी जाऊन त्यांचा डबा घेतला. जमीनदारबाईंना झाल्या घटनेची कल्पना दिली व तो स्वत: बैलगाडे हाकत नेणार असल्याचे सांगितले. तो जमीनदाराच्या वाड्यावर गेला. गाड्यात पांजरीला लटकवून पिशवी व्यवस्थित ठेवली. दावणीला बांधलेले बैल सोडले नि गाड्याला जुंपले. तो गाड्यावर बसला व त्याने गाडे हाकलले.
तो आपले गाडे हाकीत जात असता मळ्याजवळच असलेल्या रस्त्याच्या फाट्यावर त्याला दुरून एका स्त्रीचा आवाज आला, ‘ओ, गाडीवाले भाऊ.’ त्याने आवाजाच्या दिशेने बघितले. एक स्त्री एका म्हाताऱ्याला घेऊन बाजूला शेताच्या बांध्यावर एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसलेली त्याला दिसली. म्हाताऱ्याचा विव्हळण्याचा आवाज येत होता. त्या स्त्रीनेच पांडूला पुन्हा आवाज दिला.
“गाडीवाले भाऊ, माहा बाप लय बीमार हाय. अन् म्हताराबी हाय. त्येच्यानं चाल्लबी जात नाय. भाऊ, तुह्या गाडीवर बसून सोनगावालोक नेनं आमाले. लई उपकार व्हतील राया तुहे आमच्यावर.” पांडूला त्यांची दया आली. त्याने आपली बैलगाडी मागे वळवली. रस्त्याच्या बाजूला थांबवली व गाड्यावरून खाली उतरला.
पांडूने व त्या स्त्रीने हात धरून त्या म्हाताऱ्याला गाड्यावर चढविले. त्याला नीट बसवून त्या स्त्रीला तिच्या वडिलांच्या मागे बसविले व आपली बैलगाडी गावाच्या दिशेने वळविली. त्याने आपल्या बैलगाड्यावर त्या दोघा बाप-लेकीला त्याच्या गावच्या सरकारी दवाखान्याजवळ आणून खाली उरवले. पुन्हा त्याने व तिने मिळून त्या म्हाताऱ्याला दवाखान्यात नेले व तो परत आपल्या शेताकडे वळला. त्याला आलेला बघून रामराव आदी साऱ्यांना खूप आश्चर्य वाटले. ते स्वत: पटकन धावत पुढे गेले व त्यांनी गाडे सोडण्यास पांडूला मदत केली. जेव्हा त्याने रस्त्यातील घटना सांगितली, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. प्रसंगावधान राखून एक परोपकाराचे कार्य केल्याबद्दल त्यांनी शाबासकी दिली.
उशीर झाल्याने कदाचित जमीनदार आपल्यावर रागावतील, असे पांडूला वाटले होते. पण जेव्हा त्यांनीही पांडूची पाठ थोपटली, तेव्हा तर त्याला आभाळ ठेंगणे झाले. जमीनदारांच्या गड्याच्या नातेवाइकाच्या निधनाने एखादेवेळी मळ्यावर न्याहाऱ्या पोहोचविण्याचे काम अवकारीही होऊ शकले असते. पण पांडूने ते आपल्या हिमतीने पार पाडले. त्यामुळे त्यांचा पांडूच्या कर्तृत्वावर खूप विश्वास बसला. त्यांनी पांडूच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: उचलली व त्याच्या वडिलांना किसनला त्याचे नाव शाळेत टाकण्यास सांगितले. दुसऱ्या दिवसापासून पांडू शाळेत दिसू लागला व मन लावून आपला अभ्यास करू लागला.