Monday, July 15, 2024

सहल…

  • प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
कोणालाही सहल खूप आवडते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दैनंदिन जीवनातील चाकोरी मोडली जाऊन ताण कमी होतो. सहलीमध्ये प्रत्येकजण कोणती ना कोणती तरी सकारात्मकता जोडत असतो.

फार मजा नाही आली ना शीर्षक वाचताना? नाही म्हणजे ‘आऊटिंग,’ ‘गेट-टुगेदर,’ ‘पार्टी,’ ‘नाईट आउट’ किंवा कमीत कमी ‘पिकनिक’ म्हटले तर छान वाटते, नाही का? तर कोणता आवडतो तो शब्द वापरा पण कधीतरी घराबाहेर पडाच!

गड-किल्ले पाहा, समुद्र – धरण – नद्या अनुभवा, धबधब्याखाली चिंब भिजा, चांदण्या रात्री नौकाविहार करा, हुरडा पार्ट्या करा, निसर्गातील सृष्टीसौंदर्य नाही, तर मानवनिर्मित कलासौंदर्याचा आस्वाद घ्या. छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठा आनंद मिळवा!

एक ‘मुंबईकर’ म्हणून मुंबईचेच उदाहरण घेते. मुंबईच्या आसपास आपल्याला येऊर, कर्जत, बदलापूर, विरार, पनवेल या भागांमध्ये असलेले काही बंगले एका दिवसासाठी भाड्याने घेता येतात. एखाद्या रात्री जर मुक्काम करण्याइतका वेळ असेल, तर खोपोली, खंडाळा, लोणावळा, अलिबाग इत्यादी ठिकाणीही जाता येते, तर अशा या बंगल्यांमध्ये दोन-तीन रूम, पोहण्याचा तलाव, म्युझिकल शॉवर्स, खेळांची काही साधने, उत्तम खाण्या-पिण्याची सोय असते. जितका मोठा गट तितके हे स्वस्त पडते.
आता सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेक गट/समूह वाढले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची माणसे एकत्र येतात, भेटतात, मजा करतात, सहलीला जातात जसे की व्हॉट्सअॅप ग्रुप, एखादी संस्था (आध्यात्मिक/सामाजिक/राजकीय इ.), शाळा, कॉलेज – बँक – कंपनी इत्यादी ठिकाणचे सगळे कर्मचारी अशा तऱ्हेच्या सहली आयोजित करतात. त्याचबरोबर नातेवाईक आणि मित्रमंडळी हेही एकत्रितपणे सहलीला जायचा प्रयत्न करतात. समविचारी, समवयीन असतील, तर खूप मजा येते, कारण सगळ्यांना समजणारे आणि सामावून घेणारे असे काही विषय असतात आणि मग तिथे तेच चर्चिले जातात.

अलीकडेच शालेय सवंगड्यांबरोबर सहलीमध्ये जाण्याचा योग आला. एकतर खूप वर्षानंतर आम्ही एका वर्गातील मित्रमंडळी एकत्र भेटलो याचा आनंद होताच; परंतु ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो त्या शाळेबद्दलचा अभिमान, त्या शिक्षकांबद्दलचा आदर आणि जे त्यादिवशी त्यावेळी येऊ शकले नाहीत, अशाही मित्र-मैत्रिणींची आठवण, आत्मीयतेने काढून शाळेपासूनच्या अनेक सहलींचा आढावा घेतला गेला गेला. भूतकाळातील सर्व रम्य आठवणींचा गोफ विणला. अजूनही हे सगळं आठवतंय याविषयी आपल्याच स्मरणशक्तीचे आभार मानले.

शालेय उपक्रमातील ‘सहल’ हाही एक अभ्यासक्रमाचाच महत्त्वाचा भाग आहे. हा लेख वाचताना प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनातील सहली आठवल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चितच!कोणालाही सहल खूप आवडते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दैनंदिन जीवनातील चाकोरी मोडली जाऊन ताण कमी होतो. सहलीमध्ये प्रत्येकजण कोणती ना कोणती तरी सकारात्मकता जोडत असतो. प्रत्येक माणसामध्ये कोणतेतरी गुण असतातच! ज्याला उत्तम गाणे गाता येते, तो त्या सहलीत गाणे गातो… हं बाकीचे सुरात सूर मिसळतात. ज्याला चांगले नाचता येते तो छान नाचून दाखवतो… बाकीचेही आपले अंग हलवून घेतात. ज्याला उत्तम जोक सांगता येतात, तो ते सांगतो आणि बाकीचे हास्यात सामील होतात. अनेक प्रकारचे खेळ गट एकत्रितपणे खेळू शकतो जसे की ‘हौजी,’ ‘पासिंग द पार्सल,’ ‘गाण्याच्या भेंड्या’ इ. जे शांतपणे बसूनसुद्धा खेळता येतात. अशा सगळ्या खेळांचा लाभ आम्ही घेतला. आम्ही सर्व एकाच वर्षी दहावी पास झालेलो होतो त्यामुळे समवयीन होतो. समवयीन लोकांचे प्रश्न खूप सारखे असतात. त्यामुळे एखादे मोबाइलचे नवीन ॲप असेल, तर त्याचे फायदे/तोटे, गुंतवणूक, शेअर मार्केट, व्यायाम, डाएट, मनःशांतीचे काही उपाय, वैचारिक देवाण-घेवाण इत्यादी ज्ञानभंडाराने समृद्ध होता आले.

मराठी विश्वकोशातील व्याख्येप्रमाणे ‘सहल म्हणजे मनोरंजनार्थ केलेला प्रवास, सोबत्यांसमवेत सहप्रवासाचा सामुदायिक आनंद देणारा व आनुषंगाने सहलस्थळाची प्रत्यक्षदर्शी माहिती व ज्ञान मिळवणे,’ हे सर्व आमच्या एकदिवसीय छोट्याशा सहलीनेही साध्य करूनच एकमेकांचा निरोप घेतला ते पुढच्या सहलीची तारीख आणि जागा निश्चित करूनच! मग आपले अनुभव काय आहेत सहलीविषयीचे आणि कधी निघताय सहलीला? शुभस्य शीघ्रम!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -