Wednesday, July 17, 2024

तेजोनिधी

  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

सूर्य दिसेल, चंद्र फिरेल
चांदण्यांनी आभाळ भरेल!

अवकाश, ब्रह्माण्ड, विश्व याच चंद्र, सूर्य, चांदण्यांनी व्यापलेले आहे. आपल्या डोळ्यांसमोर आणि आपल्या नजरेच्याही पलीकडचे हे विश्व सुंदर, विलोभनीय आणि तितकेच कुतूहल निर्माण करणारे आहे. आपल्या विचारांच्याही, कल्पनेच्याही पलीकडचा हा पसारा आपल्या अंगणात अनेक सूर्य, अनेक चंद्र, ग्रहगोल, कदाचित अब्ज या शब्दपेक्षाही अगणित चांदण्या घेऊन पसरले आहे.

याच पसाऱ्यातला आपल्याला दिसणारा, आपला हक्काचा सूर्य, भास्कर, तेजोनिधी… आकाशात दिवसभर तेजाने तळपणाऱ्या या तेजाच्या गोळ्याला किती ती नावे आहेत. त्यात सध्याच्या ऋतूमध्ये तर त्याचे उग्र रूप दिसते आहे. उष्ण कटीबंधीय भागात तर त्याचा रुबाब काही औरच असतो. सध्याही आहेच. सध्या घरातून बाहेर पडलो तरी आपण म्हणतो आपल्या जीवाची काहीली होतेय, पण हा काळ त्याच्या उत्सवाचा काळ… पाऊस, थंडीत त्याचा प्रभाव तसा निष्प्रभ झालेला असतो. त्यामुळे हा तेजोनिधी त्याचं सगळं उट्ट याच उन्हाळ्यात जणू काढत असतो असं म्हणूया.

पण याच सूर्याची किती ती रूपे भोवताली दिसत असतात. तो थेट डोळ्यांनी दिसतो तसा, वेगवेगळ्या ग्रहणातला, थेट अवकाशातून दिसणारा हा सूर्य! ऊर्जेचा स्रोत! अनेक उपाधी त्याला दिलेल्या आहेत. या अवकाशात त्याच्या भोवती फिरणाऱ्या ग्राहमालेत अनेक ग्रह आहेत. पण पृथ्वीसोबतच त्याचं नातं अगदी वेगळं! जणू राधा-कृष्णासारखं! कधीही जवळ न येताही एकमेकांवर अशब्द प्रेम करणारं, सूर्यभोवती अखंड फिरणाऱ्या पृथ्वीसारखं. वि. वा. शिरवाडकरांनी किती सुंदर शब्दांत हे नातं आपल्या कवितेतून उलगडलं आहे.

‘युगामागुनी चालली रे युगे ही,
करावी किती भास्करा वंचना,
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना’

हेच शब्द नव्हे तर संपूर्ण रचनाच हे नातं उलगडून जाते.

सूर्य शास्त्रज्ञांसाठी अद्याप पूर्णपणे न उलगडणारे कोडे, सामान्यांना अंधारातून प्रकाश दाखवणारा स्रोत, लहानग्यांसाठी हनुमानाची गोष्ट ऐकताना भेटणारा लाल चुटुक गोळा आणि प्रेमी युगुलांसाठी त्यांच्या भावविश्वातील त्यांचा सखा, सोबती. प्रेम ही अशी भावना आहे की, ती कधी फक्त दोघांमधली असते, कधी ती जग व्यापते, तर कधी या ब्रामांडात सुद्धा प्रेमाच्या संवेदना जाणवतात.
याच प्रेम या भावनेतला तो तेजोनिधी, सखा, सोबती!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -