Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजश्री क्षेत्र गणपतीपुळे

श्री क्षेत्र गणपतीपुळे

  • कोकणी बाणा: सतीश पाटणकर

सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारीत सूयार्स्ताच्या वेळी किरणे थेट स्वयंभू पाषाणाचं दर्शन घेतात, तर पावसाळ्यात भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरणस्पर्श करतात.

गणपतीपुळे हे स्वयंभू गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. टेकडीवरील खडकात दिसणारा चेहरा हा गणपती मानला जातो. या स्वयंभू अखंड भगवान गणेशाभोवती मंदिर बांधले गेले. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक! या स्थानाचे वैशिट्य इथल्या असीम सृष्टीसौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र. समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण. मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं, असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य! सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे.

गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. त्यातही कोकणच्या लाल मातीतील वनराजीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. माडाच्या मुळातच देखण्या वृक्षाने किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक नैसर्गिक महिरप साकारली आहे. इथल्या आंब्याच्या हिरव्या पण गडद अशा सावलीने तापमान तर राखलं आहेच, पण भारताला लाभलेलं प्राचीन गांभीर्य जपलेलं आहे. जिथं माडांची आणि आंब्याची गर्द झाडी आहे, तिथली प्रत्येक सायंकाळ एका समृद्ध आणि प्रसन्न मूडने समाप्त होते. याच कारणाने गणपतीपुळ्याचा सन्‌ सेट (सूर्यास्त) भाविक पर्यटकांना गेली अनेक वर्षे भुरळ घालत आला आहे.

श्री गणेशस्वरूप असलेलं स्वयंभू पाषाण समुद्रसपाटीला समांतर आहे. साक्षात्कार झाल्यानंतर हे स्थान जणू पुन्हा प्रकट झालं. पाचशे वर्षांपूर्वी बाळभटजी भिडे यांना या साकार रूपाचा दृष्टांत झाला. त्यांनीच केंबळी (गवताचं) छप्पर उभारून पहिली पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव आण्णाजी दत्तो यांनी केंबळी छप्पराच्या जागी सुंदर घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी माधवराव वासुदेवराव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढविला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. आज चित्रात दिसणाऱ्या मंदिराचं बांधकाम सन १९९८ ते २००३ या कालावधीत सुरू होतं.

प्राचीन भारतीय स्थापत्य कला डोळ्यांसमोर ठेवून नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. एकाच दगडातून कोरून काढल्याचा भास व्हावा, असं रेखीव बांधकाम रेड आग्रा या खास पाषाणातून उभं राहिलं आहे. या जागेची नैसर्गिक ठेवण मुळातच एक उत्तम प्राकृतिक आविष्कार आहे. उंच घुमटाकृती गर्भागार आणि सभामंडपावरील नक्षीदार छप्पर संधीप्रकाशात डोळ्यांचं पारणं फेडतात. मंदिराच्या दक्षिणोत्तर दोन्ही बाजूला पाच त्रिपुरं आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला जेव्हा त्यावरील दिवे प्रकाशमान होतात, तेव्हा मंदिराची रोषणाई आपल्याला दीपवून सोडते.

सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सूयार्स्ताच्या वेळी किरणे थेट स्वयंभू पाषाणाचं दर्शन घेतात, तर पावसाळ्यात उधाणाच्या भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरणस्पर्श करतात. मंदिरामागचा डोंगर स्वयंभू म्हणून संरक्षित आहे. या स्वयंभू स्थानाला प्रदक्षिणा म्हणजे डोंगराला प्रदक्षिणा. डोंगराभोवतीचा हा प्रदक्षिणा मार्ग जांभ्या दगडानी बांधून घेतला आहे. प्रदक्षिणा मार्गावरून होणारं सागरदर्शन हा सुद्धा आल्हाददायक अनुभव असतो. कालबद्ध अशा तीन नैसर्गिक ऋतूंचं वरदान हे दक्षिण भारताचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. निसर्गाच्या या तीनही अवस्थांचं नियमित आणि संयमित दर्शन श्री गणेशाच्या या आद्यभूमीत दिसून येतं. त्यामुळे अलीकडे वर्षभर भाविक पर्यटकांची रिघ लागते. उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमी तापमान, स्वच्छ सूर्यप्रकाश, सूर्य कर्कवृत्ताकडे झुकल्याने उशिरा होणारा सूर्यास्त आणि त्यामुळे लांबत जाणारा सनसेटचा देखावा. आसमंतात उभारलेल्या अतिभव्य यज्ञकुंडात उतरणारं सूर्यबिंब. क्षितिजाच्या अथांग रेषेवर रंगांची मनमोहक उधळण सारी सायंकाळ व्यापून उरलेली असते. मोसमी वाऱ्याची चाहूल देणारे ढग जेव्हा क्षितिजावर उगवतात तेव्हा या रंगांमध्ये ढगांचे अनेक घनाकार मिसळून जातात. मुंबईपासून सुमारे ३५० कि. मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपती पुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अति प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङ्मयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.

कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहे. हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात (सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले, तरच अन्नग्रहण करीन, असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तींची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झाले आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल, असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की, सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गाईच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तत्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरू केली.

गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले.

काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात भाविक पर्यटकांची संख्या कमी होत असे, पण आता पर्यटनाच्या आणि जीवनशैलीच्या संकल्पना बदलल्या आहेत. वाहतुकीच्या सोयी झाल्याने आता भर पावसात किनाऱ्यावर उतरणारे मुसाफीर वाढले आहेत. भर पावसात टपोरे तुषार झेलत लाटांशी खेळता येत. सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेता घेता पावसात भिजण्याची तऱ्हा काही औरच आनंद देते. श्रावणाची चाहूल लागताना पावसाचा जोर जेव्हा कमी होतो, तेव्हा अवघ्या परिसरावर सायंकाळी जो संधीप्रकाशाचा रंग पसरतो त्याची मोहकता डोळ्यांखेरीज फोटो, शूटिंग यापैकी कशानेही टिपता येत नाही. हिवाळ्यात भाविक पर्यटकांचा पूर लोटतो आणि हा उत्सव पावसाच्या आगमनापर्यंत टिकून राहतो. हिवाळ्यातही सरासरी तापमानात फारसा फरक पडत नाही. उलट किनारा ऊबदार बनतो. पर्यटकांचा लाटांशी चाललेला खेळ लांबत राहतो. लाटांशी खेळून बाहेर पडावसं वाटलं तर पुळणीत पडून राहावं. या पुळणीला खेटून असलेली खुरट्या डोंगरांची रांग सागराचं विहंगम दर्शन द्यायला एक नैसर्गिक आसन आहे. लांबसडक पसरलेल्या पुळणीला लागून असलेली ही डोंगररांग पर्यटकांना सर्वाधिक पसंत आहे. सागराचा भला मोठा पट दृष्टीच्या कवेत घेण्यासाठी बनवलेलं जणू भल मोठं प्रेक्षागृह. इथून सनसेट पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हिवाळ्यात पहाटेच्या आणि सायंकाळच्या संधीप्रकाशात मंदिराच्या स्थापत्यासह स्वयंभू डोंगराचं दर्शन दृष्टीसह मनाला सुखावणारं असतं.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -