जिथे नाट्यगृह तिथे समूहाचे बॅनर झळकले होते. त्यात अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांची छबी ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेच आहेत, हे सांगणारी होती. नेमके तसेच झाले. दामले परिषदेचे अध्यक्ष झाले.
स्थळ यशवंत नाट्य संकुल. निवडणूक अधिकारी पहिल्या फेरीतला निकाल जाहीर करतात. अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांच्या नावाबरोबर त्यांच्या मतांची संख्या जाहीर करतात आणि छोटेखानी सभागृहात टाळ्यांचा कलकलाट सुरू होतो. टाळ्या वाजवणारे कोणी प्रेक्षक नव्हते, तर ते दामले यांचे मित्र, स्नेही, सहकारी जे बऱ्याच वेळा दामले यांच्या सोबत असतात. त्यांना काही मिनिटे टाळ्या वाजवणे गरजेचे वाटते म्हणजे दामले यांच्या प्रेमाची ती पावतीच म्हणावी लागेल.
मोठ्या संख्येने काही व्यक्ती एकत्र आले की, अलीकडे व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन करणे वाढलेले आहे. ज्या ग्रुपने विधायक कामाचा सपाटा लावला ते ग्रुप टिकले आहेत. गुड मॉर्निंग, गुड नाईट याचा भडीमार वाढतो, वाढदिवसाचे जाळे विस्तारले जाते. नको ते फोटो स्क्रीनवर दिसायला लागतात. वादविवाद होतात, पुढे चर्चा टोकापर्यंत जाते. परिणामी ग्रुप बंद होतो. पण, ‘मराठी नाटक समूह’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप थोडा वेगळाच म्हणावा लागेल. क्रियाशील रंगकर्मीपासून ते सच्चा रंगधर्मीपर्यंत अनेकांची नावे या ग्रुपमध्ये आहेत. प्रशांत दामले हे नाव त्यापैकी एक.
प्रत्येक सदस्याशी संपर्क असलेला सच्चा कलावंत म्हणून दामले यांचे नाव ध्यावे लागेल. त्यांच्या जीवनात कुटुंबानंतर दुसरे स्थान कोणाचे असेल तर ते नाटक. नाटकाला मध्यवर्ती ठेवून ते चित्रपट, मालिका, जाहिरात, गाठीभेटी, प्रतिष्ठेचे पुरस्कार सोहळे यांना वेळ देत असतात. सोबत डायरी घेऊन फिरणारा रंगकर्मी अशी त्यांची कलाप्रांतात ख्याती आहे. कामाची नोंद जशी तशी कार्यकुशलतेची बांधणी हे ते करीत असतात. त्यामुळे जे ठरले ते झालेच पाहिजे हा त्यांच्या कामाचा मंत्र आहे. तशी काहीशी कर्तव्य दक्षता, तत्परता त्यांना समूहात दिसली आणि संवादातून कृती, कृतीतून हित साधण्याचे ठरले. त्यामुळे नाट्य वर्तुळात भरीव कार्य दिसायला लागले. कोरोनाच्या काळात बॅकस्टेज कामगारांमध्ये अस्वस्थता दिसत होती. या कामगारांना या समूहाने मदतीचा हात दिला होता. युवा रंगकर्मी म्हणजे नव्या कलाकृतीचा शोध हे या समूहाने ओळखले. लेखन, एकांकिका स्पर्धा या गोष्टी यातूनच पुढे आल्या. बस पार्किंग, नेपथ्य ठेवण्याची समस्या यातून निर्मात्यांची सुटका केली. या सर्व कृती मागे दामले होते. दामले आणि त्यांच्या टीमच्या पुढाकाराने काम होतं. पण, अशांत मन हक्काच्या जागेचा शोध घेत होते. अशा स्थितीतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक धडकली. अंदाज घेणे सुरू झाले. कोणीच पॅनल उत्सुकता दाखवत नाही म्हणताना दामले आणि त्यांचा समूह पुढे सरसावला. बिनविरोध निवडणूक होणार असे वाटत होते, पण अनपेक्षितपणे निर्माते प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ पुढे आले आणि दोन ‘प्र’च्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली.
निवडणूक बिनविरोध होणार हा शब्द एवढ्यासाठी वापरला कारण, कांबळी आणि त्यांचे काही उमेदवार हे निवडणुकीला उभे राहणार नव्हते. तसे त्यांनी जाहीर केले होते. आता ‘आपलं पॅनल’ निवडणूक रिंगणात येते म्हणताना समूहाची जबाबदारी वाढली. प्रचाराचा धडाका लावला, वलयांकित कलाकारांना प्रचाराच्या प्रवाहात आणले. पुढे आपले उमेदवार, कार्यकर्ते यांच्यात कामाची विभागणी केली. दामले विजयी होणार, हा कुजबुजीचा विषय असला तरी गाफिल राहून चालणार नाही. ही दामले यांची रणनीती होती. त्यांनी महाराष्ट्रातील नाट्य शाखांना संपर्कात ठेवले. मंत्री आणि विश्वस्त उदय सामंत यांना प्रत्यक्ष कृतीत आणले. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार जोडले गेले. पहिली फेरी उत्तम पार पडली. समूहाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले. यात दामले हे सर्वात अग्रभागी होते, हे वेगळे सांगायला नको. काही दिवसांसाठी ही चर्चा थांबली. पंधरा-वीस दिवस उलटले असतील, पुन्हा माध्यमातून नियामक मंडळाचे सदस्य परिषदेचा अध्यक्ष कोण हे ठरवणारी ही निवडणूक होती. तसा या निवडणुकीचा गाजावाजाच व्हायला हवा, असे नाही. पण, भाजप नेते आशीष शेलार यांनी आपले पॅनलच्या वतीने मनोगत व्यक्त करणे सुरू केले आणि जे अस्सल राजकारणात घडते तसे इथे घडायला लागले. मतदान करणाऱ्या सदस्यांना अज्ञात ठिकाणी ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधून न देणे, याची पुरेपूर काळजी घेणारी ही निवडणूक होती. जिथे नाट्यगृह तिथे समूहाचे बॅनर झळकले होते. त्यात दामले यांची छबी ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेच आहेत, हे सांगणारे होते. नेमके तसेच झाले. दामले परिषदेचे अध्यक्ष झाले. प्रशांत दामले नावाच्या विजयाच्या गोष्टीला येथे पूर्णविराम मिळाला. ढोल-ताशा मंदावला, अंगावरचा गुलाल त्याच रात्री झटकला, निवडणूक हे नाट्य परिषदेच्या वाटचालीचे वादग्रस्त, संभ्रमात टाकणारे एक पान होते, ते आता त्याच रात्री पूर्णपणे उलटलेले आहे. कोणतीही कटुता मनात न ठेवता आता सर्व कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठांनी कामाला लागले पाहिजे हे त्या रात्री ठरले.
प्रशांत दामले यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेण्यापूर्वी कोणत्या कामाला प्राधान्य देणार हे जाहीर केले होते. पुरेसा वेळ दिल्यानंतर त्याची प्रक्रिया काही वर्षांत दिसणार आहे हे नक्की. पण, या प्रवासात त्यांची स्वतःची अशी एक वेगळी घोडदौड आहे. त्याच्यावर या अध्यक्षपदाचा परिणाम होणार आहे का? हे दामले यांना विचारले असता ते सांगतात. ‘कामासाठी फक्त आठ तास असतात, अशी मानसिक स्थिती असलेली अनेक माणसे समाजात वावरत असतात. मग त्यांच्याकडून कुठलेही काम पूर्ण होत नाही. प्रयोगाच्या तारखा आणि वेळ लक्षात घेता, उर्वरित वेळ मी परिषदेच्या कामासाठी देणार आहे. या पाच वर्षांत जे ठरवले, ते पूर्ण होईल याची मला खात्री वाटते. प्रथम हक्काचे नाट्य परिषदेचे नाट्यगृह सुरू व्हावे, हा माझा पहिला प्रयत्न आहे. त्याची अंतर्गत दुरुस्ती करायची की पुनर्बांधणी करायची, हे कागदपत्र तपासल्यानंतरच लक्षात येईल’ दामले हे असे कलावंत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहे पाहिली आहेत. तिथे त्याचे प्रयोगही झालेले आहेत. त्यामुळे शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने हे नाट्यगृह सुस्थितीत आणण्याचे त्यांनी ठरवलेले आहे.
व्यावसायिक नाटकाची ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्गात, कलाकारात जागृती आहे तसे काहीसे प्रायोगिक, बाल रंगभूमीसाठी व्हावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या गोष्टी करायच्या म्हणजे मुंबईची शाखा फक्त क्रियाशील असून चालणार नाही, तर गावोगावच्या शाखा यात सामावून घेतल्या जाणार आहेत. स्थानिक कलाकारांना त्या त्या शाखेत जोडून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. नाट्यकला हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. भरमसाट खर्च करून एकाच संमेलनाचे आयोजन करण्यापेक्षा निदान वर्षभरात दोन-तीन संमेलने विविध जिल्ह्यांत व्हावीत या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे दामले सांगतात. तूर्तास दामले यांनी कांबळी यांच्याकडून कामाचा दस्तऐवज आपल्या ताब्यात घेतलेला आहे. पाच वर्षांत काम पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त ते कलाकार आहेत, शिवाय त्यांना डॉक्टरेट बहाल केली आहे. अनेक विक्रम त्यांच्या नावे प्रस्थापित आहेत. देश-विदेशात नाटक पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एकंदरीत त्यांचा हा नावलौकिक पाहता ते प्रेक्षकांबरोबर, रंगकर्मींच्या अपेक्षा पूर्ण करतील असे वाटते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…