मुंबई (वार्ताहर) : दोन हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दोन हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी आपले निरीक्षण सांगितले आहे.
ते म्हणाले की, ही केंद्र सरकारने जाहीर केलेली नोटाबंदी नसून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्या क्लिन नोट पॉलिसीनुसार रु. २०००/- च्या नोटा बदली करणेसंदर्भात घेतलेला निर्णय आहे. अशाच प्रकारचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यापूर्वी दि. २३ डिसेंबर २०१५ रोजीच्या परिपत्रकाद्वारे सन २००५ पूर्वीच्या चलनातील नोटा काढून टाकणे संदर्भात घेतला होता. त्यावेळी त्या नोटा बदलून घेण्यासाठी दि. ३० जून २०१६ पर्यंत मुदत दिली होती. याचप्रकारे रु. २०००/- च्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे.
या मुदतीनंतरही आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या रु. २०००/- च्या नोटांची कायदेशीर वैधता अबाधित राहणार आहे.
रु. २०००/- च्या नोटा दि. २३ मे २०२३ पासून बँकेत भरणा करावयाचा असा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आदेश नसून त्या नोटा तुम्हाला नेहमीप्रमाणे शनिवारी अथवा दि. २२ तारखेपर्यंत देखील बँकेत भरता येतील. दि. २३ मे २०२३ ही तारीख नोटा बदलून मिळणेकरिता आहे. नोटा बदलून देण्यासाठी बँकांना कमी मूल्यांच्या नोटा करन्सी चेस्ट कडून उपलब्ध करून घेण्यासाठी आणि आपल्या सर्व शाखांमधून योग्य त्या सूचनांद्वारे आवश्यक ती योजना कार्यान्वित करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून दि. २३ मे ही तारीख रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केली आहे.
दि. ३० सप्टेंबरनंतर अथवा त्यापूर्वीदेखील पुढील कालावधीसाठी कशा प्रकारे रु. २०००/- च्या नोटा बँकांनी स्वीकृत कराव्यात या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित येतील. कारण नोटाबंदीच्या काळात पहिल्या ४३ दिवसांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदी संदर्भात एकूण ६० परिपत्रके प्रसिद्ध केली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. रु. २०००/- च्या नोटा स्वीकारतांना त्या नोटांच्या अस्सलपणाविषयी खात्री करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी बँकांवर ठेवली आहे. जर बँकेकडून चुकून बनावट नोटा स्वीकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी बँकेवर राहणार असल्याने नोटा मोजणी मशीन्स बरोबरच बनावट नोटा तपासणी मशिन्सही बँकांना जास्त प्रमाणावर उपलब्ध करून घ्याव्या लागतील. तसेच संबंधित सेवक वर्गास डोळ्यात तेल घालून काम पहावे लागणार असल्याने बँकेवरील ताण निश्चितच वाढणार आहे. बँकेमधून रु. २०००/- च्या नोटा जास्त प्रमाणात भरणा होण्याची शक्यता असल्याने फायन्यानशियल इंटिलीजन्स यूनिट च्या नियमानुसार रु. २.०० लाखांवरील रोख जमा रकमांचे व्यवहार बँकांना कॅश ट्रान्झेक्शन रिपोर्टद्वारे एफआययू ला कळवावे लागतील. अशा जादा भरणा केलेल्या खात्यांची चौकशी भविष्यात संबंधित तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दि. ३० सप्टेंबरपूर्वी अथवा दि. ३० सप्टेंबर २०२३ नंतरही रु. २०००/- च्या नोटा कोणालाही नाकारता येणार नाही. जर कोणी रु. २०००/- च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध ‘भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या क्लिन नोट पॉलिसीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक नोटेचे सरासरी आयुष्यमान निश्चित करते. रु. २०००/- च्या नोटांकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांच्या छपाईच्या वेळेसच ५ वर्षांचे आयुर्मान निश्चित केले होते. या नोटांची छपाई बँक ऑफ इंडियाने २०१८ नंतर बंद केली होती. या नोटांची केवळ स्वीकृती होत होती; परंतु या नोटांचे वितरण बँकेत होत नव्हते.
या पार्श्वभूमीवर रु. २०००/- च्या नोटा चलनातून काढून घेण्यात येतील अथवा बंद करण्यात येतील, याची खात्री व्यापार व इतर क्षेत्रांतील सर्वांनाच होती, त्यामुळे या निर्णयाचा जास्त परिणाम व्यापार क्षेत्रावर होणार नाही. रु. ५००/- व रु. १०००/- च्या नोटाबंदीनंतर नवीन नोटांच्या छपाईचा खर्च कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जास्त मूल्य असलेली रु. २०००/- ची नोट व्यवहारात आणली. या नोटांच्या बदल्यात व्यवहारात वितरण करण्यासाठी त्यांच्या एकूण मूल्यांइतक्या इतर नोटांचा कोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने चलनातील रु. २०००/- च्या नोटा बदली करणे संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही, अशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची भूमिका आहे.
प्रसिद्धी माध्यमांमध्ये नमूद केल्यानुसार दि. ३० सप्टेंबर २०२३ नंतर रु. २०००/- ची नोट ही ‘कागज का तुकडा’ राहणार नसून ती कायदेशीरदृष्ट्या वैध
असणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जनतेने नोटा बदलून घेण्यासाठी बँकांपुढे रांगा लावण्याची कोणतीही गरज नाही. तसेच दि. ३० सप्टेंबर नंतरही रु. २०००/-च्या नोटा चलनामध्ये वैध ठरणार असल्याने बाजारामध्ये भरमसाट कमिशन देऊन नोटा बदली करून घेऊ नयेत व स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये.