Monday, April 21, 2025
Homeक्रीडाIPL 2025मुंबईचा देव पाण्यात...

मुंबईचा देव पाण्यात…

हैदराबादविरुद्ध नोंदवावा लागणार मोठा विजय

  • वेळ : दुपारी ३.३० वा.
  • ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई

मुंबई (वार्ताहर) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ‘प्ले ऑफ’ प्रवेशासाठीच्या निर्णायक अशा रविवारी मुंबई इंडियन्सचा तळात असलेल्या सनरायजर्स हैदराबादशी सामना होणार आहे. मुंबईला आगेकूच करायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला लाजिरवाण्या पराभवाचा चेहरा दाखवावाच लागेल. त्यात मुंबईचा संघ यशस्वी ठरला तरी नेट रनरेटवर मुंबईचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे खेलेंगे जी जान से असे म्हणत रोहितची ब्ल्यू आर्मी रविवारी मैदानात उतरेल. हैदराबाद आधीच ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर आहे.

रोहित शर्माच्या मुंबईने आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर चांगली कामगिरी केली आहे. येथे आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. कारण मुंबईला त्यांची निव्वळ धावगती (नेट रनरेट) सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. मुंबईचे १४ गुण असून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुलाही १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी असल्याने मुंबईला या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्या तीन संघांचे १४ गुण आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सने त्यांचे सर्व सामने खेळले आहेत. पण त्यांची निव्वळ धावगती मुंबईपेक्षा चांगली आहे. या तिन्ही संघांच्या तुलनेने चांगल्या नेट रनरेटमुळे बंगळूरु चौथ्या स्थानावर आहे.

जर मुंबईने हा सामना जिंकला आणि आरसीबीला गुजरात टायटन्सने सायंकाळच्या दुसऱ्या सामन्यात पराभूत केले, तर मुंबई प्ले ऑफमध्ये पोहोचेल. परंतु हे दोन्ही संघ जिंकल्यास उत्तम निव्वळ धावगती असलेला संघच पुढे जाईल. घरच्या मैदानावर मुंबईला सर्वात मोठी चिंता गोलंदाजीची आहे. कारण येथे त्यांच्याविरुद्ध सलग चार सामन्यांत २०० हून अधिक धावा झाल्या आहेत. डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे मुंबईने अनेक वेळा सामन्यावरील नियंत्रण गमावले आहे.

रोहित त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसतानाही, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन आणि नेहल वढेरा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. रोहितला पाच सामन्यांत दुहेरी आकडा गाठता आला नाही. पण त्याने शेवटच्या दोन सामन्यांत २९ आणि ३७ धावा केल्या आणि गत सामन्याप्रमाणे कर्णधार मुंबईला पुन्हा धमाकेदार सुरुवात करून देईल, अशी आशा आहे.

दुसरीकडे सनरायझर्सकडे गमावण्यासारखे काहीही नाही आणि ते विजयासह स्पर्धेचा शेवट करण्याचा प्रयत्न करतील. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात हेनरिच क्लासेनने शतक झळकावले. त्याचवेळी हॅरी ब्रूक्सही फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानंतरही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. कारण आरसीबीविरुद्ध संघाच्या गोलंदाजांनी निराशा केली. भुवनेश्वर कुमारने आपल्या चार षटकांत ४८ धावा दिल्या होत्या, तर कार्तिक त्यागी आणि टी नटराजनही महागडे ठरले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -